बिहार विधानसभा निवडणूक निकालातून गोव्यातील विरोधक काही धडा शिकलेत की नाही हे येणाऱ्या काळात कळून येईल. आम आदमी पक्षाने अगोदरच स्वतःची वेगळी वाट धरलेली आहे. दिल्ली किंवा पंजाब म्हणजे गोवा नव्हे, गोव्याचे राजकारण वेगळे आहे. इथे काँग्रेसला चिरडण्याएवढा आम आदमी पक्ष मोठा झालेला नाही. अन्य पक्षांसोबत युती करून पुढे जाणे हेच विरोधकांसाठी हिताचे आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना हे कळले आहे. आरजीच्या नेत्यांनाही युतीची गरज कळते. मात्र अधूनमधून आरजीवाले वेगळा सूर लावतात. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनाही विरोधकांनी एकत्र राहावे लागेल हे समजते. मात्र काँग्रेसमधील काही नेत्यांना (जे निवडणूक जिंकलेले नाहीत) त्यांना अजून युती गरजेची वाटत नाही. काँग्रेस असो, आप असो किंवा आरजी, कोणताच विरोधी पक्ष स्वबळावर सर्व जागा लढवू शकत नाही.
मुळात मतदानादिवशी काँग्रेसकडेदेखील टेबलवर बसण्यासाठी माणसे नसतात. काँग्रेसचे काही उमेदवार तर तिकीट मिळाल्यानंतर अनाथ झाल्यासारखे असतात. ही प्रत्येक निवडणुकीवेळची स्थिती आहे. मडकई, प्रियोळ, वाळपई, पर्ये, ताळगाव, पणजी, डिचोली किंवा अन्य काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडे निवडणुकीवेळी पुरेसे कार्यकर्तेदेखील नसतात. उमेदवार म्हणून कुणालाही उभे करून मग त्याला वाऱ्यावर सोडून देण्याची वेळ काँग्रेसवर येते. २०२२ च्या निवडणुकीत सासष्टीत आम आदमी पक्षाला दोन जागा जिंकता आल्या. सासष्टीबाहेर एकही जागा मिळाली नाही. उत्तर गोव्यात आपचा प्रभाव अजून नाही. आरजी पक्ष २०२२ साली कसाबसा सांतआंद्रेत एक जागा जिंकला. ९-१० टक्के मते त्यावेळी आरजीने घेतली, पण नंतर लोकसभा निवडणुकीवेळी आरजीला मतदारांचा प्रतिसाद मिळाला नाही.
एकंदरीत राज्यात विरोधातील प्रत्येक पक्षाला खूप मर्यादा आहेत. काँग्रेस पक्ष जिल्हा पंचायत निवडणुकीवेळीदेखील सगळीकडे उमेदवार देऊ शकणार नाही. काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाहीत, हे मान्य करावेच लागेल. आम आदमी पक्षाने बारा उमेदवार जाहीर केले. त्यांनी कामही सुरू केले. मात्र त्यापैकी कितीजण खरोखर प्रबळ आहेत, हे २० डिसेंबरनंतर निकालावेळी स्पष्ट होईल. माजीमंत्री इजिदोर फर्नांडिस यांना गोवा फॉरवर्ड पक्षाने प्रवेश दिला. त्यामुळे आरजीचे नेते रुसले आहेत. आम आदमी पक्षानेही अप्रत्यक्षरीत्या यावर टीका केली आहे. पूर्वी फक्त भाजपचेच एक वॉशिंग मशीन होते, पण आता कथित विरोधी आघाडीच्या माध्यमातून फुटिरांसाठी आणखी एक वॉशिंग मशीन तयार झाले आहे, अशी टीप्पणी आपच्या एका नेत्याने कुणाचे नाव न घेता केली आहे.
इजिदोर हे काही जिल्हा पंचायत निवडणुकीसाठीचे उमेदवार नव्हेत. ते २०२७ साली काणकोणमधून विधानसभा निवडणूक लढवू पाहतात. इजिदोर यांना गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश देणे किंवा काँग्रेसने माजी सरपंच अमित सावंत यांना आपल्या पक्षात घेणे या दोन वेगवेगळ्या घटना आहेत. मात्र या दोन्ही घटनांवरून विरोधकांमधील वादांनी तोंड वर काढले. सत्ताधारी भाजपला विरोधकांची युती कधीच होऊ नये असेच वाटू शकते. समजा २०२७ च्या निवडणुकीसाठी गोव्यात काँग्रेस, आरजी, गोवा फॉरवर्ड यांच्यात युती झाली तर विरोधकांना त्या युतीचा थोडा तरी लाभ होईल. मात्र प्रत्येक पक्ष स्वबळावर लढायला गेला, तर सगळेच राजकीयदृष्ट्या गारद होतील. काहीजण विरोधकांमध्ये राहूनदेखील सत्ताधारी भाजपशी गुड रिलेशन ठेवून आहेत. किंबहुना प्रत्येक राज्यात भाजपचे नेते विरोधकांमध्येही आपले काही हितचिंतक पेरत असतात. त्यामुळे विरोधकांना युती करतानादेखील काळजी घ्यावी लागेल.
इजिदोर यांना गोवा फॉरवर्ड पक्षाने सामावून घेतल्याने आकाश कोसळलेले नाही. पूर्णपणे सोज्ज्वळ, स्वच्छ राजकारण कुणीच करू शकणार नाही. तसे केले तर मतदारांची शंभर टक्के साथ लाभेल याची हमी कोण देईल? तडजोड व डावपेच म्हणून काहीवेळा फुटिरांना सोबत घेऊनही राजकारण खेळायचे असते. पूर्णपणे सोज्ज्वळ व सोवळ्या राजकारणाचा आग्रह पस्तीस वर्षांपूर्वी धरला जात होता. त्यावेळी अनेक सज्जनदेखील निवडून यायचे. आता कोण निवडून येतात, ते जनतेला ठाऊक आहेच. कारण निवडून देणारी जनताच असते. तूर्त विजय सरदेसाई विरोधकांची मोट बांधण्याची जी खेळी खेळत आहेत, ती राजकीय हुशारी आहे. ते प्रॅक्टीकल राजकारण आहे.
Web Summary : Goa's opposition faces limitations, unity is crucial for 2027 elections. Vijay Sardesai's efforts to unite opposition parties show political acumen amidst challenges and potential alliances.
Web Summary : गोवा में विपक्ष को सीमाओं का सामना करना पड़ता है, 2027 के चुनावों के लिए एकता महत्वपूर्ण है। विजय सरदेसाई के विपक्षी दलों को एकजुट करने के प्रयास चुनौतियों के बीच राजनीतिक कौशल दिखाते हैं।