बोरीत खड्ड्याने घेतला महिलेचा बळी
By Admin | Updated: July 16, 2014 01:24 IST2014-07-16T01:22:07+5:302014-07-16T01:24:54+5:30
फोंडा : बोरी पुलाजवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मंगळवारी एका महिलेला जीव गमवावा लागला. चुलत दीराच्या दुचाकीवरून कामावर जाताना खड्डे चुकविण्याच्या

बोरीत खड्ड्याने घेतला महिलेचा बळी
फोंडा : बोरी पुलाजवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मंगळवारी एका महिलेला जीव गमवावा लागला. चुलत दीराच्या दुचाकीवरून कामावर जाताना खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने मंजुळा प्रमोद नाईक (वय २७, रा. वाजे-शिरोडा) हीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीचालक रोहित रंगनाथ शिरोडकर किरकोळ जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.
मंजुळा ही कोलवा येथील एका हॉटेलात स्वागतिका म्हणून कामाला होती. वेर्णा येथे कामाला जाणाऱ्या चुलत दीरासोबत ती शिरोड्याहून बोरी पुलापर्यंत दुचाकीवरून (क्र. जीए 0५ ए ८१८६) येत असे. तेथून बसमधून ती मडगावला जात होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी दोघेही दुचाकीवरून पुलाजवळील रस्त्यावरून जात होती. खड्डे चुकवण्याच्या नादात रोहित यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून जाऊ पाहाणाऱ्या ट्रकने (क्र. एपी २३ वाय ४५२९) धडक दिल्याने मंजुळा रस्त्यावर पडली व ट्रकचे पुढचे चाक तिच्या अंगावरून गेल्यामुळे जागीच गतप्राण झाली.
फोंड्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन गावडे यांनी पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. ट्रकचालक पसार झाल्याने त्याचे नाव समजू शकले नाही. पोलिसांनी क्लिनरला ताब्यात घेतले. मात्र, त्याला मल्ल्याळीशिवाय कोणतीही भाषा अवगत नसल्याने पोलिसांपुढे पेच निर्माण झाला आहे.
मंजुळा हिचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिच्या पश्चात पती, सासू, सासरे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)