कुलगुरूंना राज्यपालांचा धक्का

By Admin | Updated: October 23, 2015 01:59 IST2015-10-23T01:58:56+5:302015-10-23T01:59:08+5:30

पणजी : गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शेट्ये यांना मुदतवाढ देण्यास राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी गुरुवारी नकार दिला. तसेच शेट्ये यांच्यासह कुलसचिव विजयेंद्र कामत यांनीही शुक्रवार,

The Vice Chancellor Pushes the Governor | कुलगुरूंना राज्यपालांचा धक्का

कुलगुरूंना राज्यपालांचा धक्का

पणजी : गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शेट्ये यांना मुदतवाढ देण्यास राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी गुरुवारी नकार दिला. तसेच शेट्ये यांच्यासह कुलसचिव विजयेंद्र कामत यांनीही शुक्रवार, दि. २३ रोजी पदमुक्त व्हावे, अशीही सूचना राज्यपालांनी कुलपती या नात्याने केली. सरकारला यामुळे धक्का बसला असून सरकारविरुद्ध राज्यपाल असा संघर्षही त्यातून पुढे आला आहे.
शेट्ये यांनी कुलगुरू म्हणून तीन वर्षे काम पाहिले. तथापि, त्यांना आणखी दोन वर्षे मुदतवाढ मिळावी, असे मुख्यमंत्री पार्सेकर यांना वाटते. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांना भेटून तसे कळविले. गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी समितीनेही त्यासाठी गोवा विद्यापीठाच्या नियमांमध्ये काही दुरुस्त्या केल्या. मात्र, कुलपती या नात्याने राज्यपाल सिन्हा यांनी या दुरुस्तीला मान्यता दिली नाही. शेट्ये यांना मुदतवाढ देण्यास राज्यपाल तयार नसल्याने सरकारही पेचात सापडले आहे. मुख्यमंत्री पार्सेकर हे स्वत: या साऱ्या प्रकारामुळे मनातून नाराज झाले आहेत; पण त्यांनी आपली नाराजी व्यक्त न करता स्थितीवर तोडगा काढण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. मुख्यमंत्र्यांनी याविषयी गुरुवारी सायंकाळी शिक्षण खात्याच्या सचिवांशी चर्चा केली.
राज्यपालांच्या कार्यालयातून दोन पत्रे गुरुवारी कुलसचिव कामत यांना मिळाली. शेट्ये यांनी वयाची ६५ वर्षे पूर्ण केल्याने त्यांनी शुक्रवारीच पदमुक्त व्हावे, अशा आशयाचे पत्र प्रथम आले. त्यानंतर कामत यांनीही शुक्रवारीच कुलसचिव म्हणून पदमुक्त व्हावे, असे राज्यपालांनी कळविले. कामत यांचे यामुळे नुकसान होत नाही; कारण त्यांचे मूळ पद गोवा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून असून ते त्यांच्या त्या मूळ पदावर काम करतील. त्यामुळे ते शुक्रवारी सायंकाळी कुलसचिव पद सोडतील. शेट्ये यांच्यासमोरही पद सोडण्याशिवाय सध्या पर्याय राहिलेला नाही. कामत यांना पूर्वीच्या कुलगुरूंनी मुदतवाढ दिली होती. एप्रिल २०१६ पर्यंत त्यांना कुलसचिवपदी ठेवण्यात आल्याचे नियुक्ती पत्र विद्यापीठाने त्या वेळी दिले होते. तथापि, तो निर्णय राज्यपाल सिन्हा यांनी फिरविला आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: The Vice Chancellor Pushes the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.