लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कुर्टी-फोंडा येथे पशू वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासूनच सुरु होईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्षष्ट केले.
हे महाविद्यालय सुरु करण्यासाठी चाललेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सावंत यांनी काल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बॅचलर इन वेटेरेनरी सायन्स पदवीसाठी ६० जागा असतील. यासाठी सर्व सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत. वेटेरेनरी कौन्सिल ऑफ इंडिया व गोवा विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतर हे महाविद्यालय सुरु केले जाईल. या वर्षी हे महाविद्यालय सुरु झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश देताना त्यासाठी केंद्राकडे समन्वय साधून आवश्यक सोपस्कार वेळेत करावेत, अशा सूचनाही दिल्या. जमीन हस्तांतरण, पायाभूत सुविधा, कर्मचारी भरती, प्रयोगशाळा व जनावरांसाठीची फार्म वगैरे विषयांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, राज्यात पशू वैद्यकीय महाविद्यालयाची सोय नव्हती. त्यामुळे दरवर्षी दहा ते बारा विद्यार्थ्यांना हे शिक्षण घेण्यासाठी पुद्दुचेरी किंवा मुंबईला जावे लागत असे.