व्ही. एम. प्रभुदेसार्इंची

By Admin | Updated: June 18, 2014 07:25 IST2014-06-18T07:22:31+5:302014-06-18T07:25:09+5:30

पणजी : सरकारने मंगळवारी अचानक एका आदेशाद्वारे क्रीडा खात्याचे संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांची बदली केली असून ब्राझील दौऱ्याच्या वादाचा

V. M. Prabhudesai's | व्ही. एम. प्रभुदेसार्इंची

व्ही. एम. प्रभुदेसार्इंची

पणजी : सरकारने मंगळवारी अचानक एका आदेशाद्वारे क्रीडा खात्याचे संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांची बदली केली असून ब्राझील दौऱ्याच्या वादाचा हा परिणाम असल्याची जोरदार चर्चा राजकीय गोटात व प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे.
ब्राझीलचा दौरा करण्याची काही मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची योजना टीकेमुळे अयशस्वी ठरली. काही अधिकारी व दोघा क्रीडापटूंचीही नावे अगोदर ब्राझील दौऱ्याच्या यादीत होती. तथापि, या योजनेची बातमी बाहेर फुटण्यामागे काही अधिकारी जबाबदार असल्याचा संशय सरकारमधील काही घटकांना आला आहे. प्रभुदेसाई यांची बदली हा त्याचाच परिणाम असल्याची चर्चा आहे. प्रभुदेसाई यांची बदली व नियुक्ती आता त्यांच्या पूर्वीच्या पदी म्हणजे उपसंचालक, शारीरिक शिक्षण व युवा सेवा या जागी करण्यात आली आहे. एक प्रकारे ही पदावनती असल्याचेही मानले जात आहे. सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत क्रीडा क्षेत्रात मात्र नाराजीचा सूर आहे.
क्रीडा खात्याच्या संचालकपदी वाय. बी. तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तावडे हे मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी होते. त्यांच्या जागी आता सुनील मसुरकर यांची नियुक्ती झाली आहे. उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद बुगडे यांची नियुक्ती दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी झाली आहे. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी मिहिर वर्धन यांना पुन्हा उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारीपदी आणण्यात आले आहे. पंचायत खात्याचे संचालक नारायण सावंत यांची बदली करून त्यांना मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारीपदी आणण्यात आले आहे. सिद्धिविनायक नाईक यांना सरकारने कोणतेच पद दिले नव्हते. त्यांची नियुक्ती आता आयडीसीच्या विशेष भू-संपादन अधिकारीपदी करण्यात आली आहे. मोपा विमानतळ प्रकल्पाशी संबंधित भूसंपादन पदाचाही अतिरिक्त ताबा त्यांच्याकडे देण्यात आला आहे.
संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांच्याकडे पंचायत संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. विजय परांजपे यांच्याकडे शिष्टाचार खात्याच्या संयुक्त सचिवपदाचा अतिरिक्त ताबा, आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. नाईक यांच्याकडे उद्योग खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा सोपविण्यात आला आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: V. M. Prabhudesai's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.