ट्रकमालकांच्या आंदोलनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी?
By Admin | Updated: December 13, 2015 01:44 IST2015-12-13T01:44:36+5:302015-12-13T01:44:51+5:30
खनिज मालाच्या वाहतुकीसाठी वाढीव दराची मागणी करणाऱ्या अखिल गोवा ट्रकमालक संघटनेने रविवारपासून उत्तर गोव्यात

ट्रकमालकांच्या आंदोलनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी?
शेखर नाईक ल्ल फोंडा
खनिज मालाच्या वाहतुकीसाठी वाढीव दराची मागणी करणाऱ्या अखिल गोवा ट्रकमालक संघटनेने रविवारपासून उत्तर गोव्यात जनसंपर्क रॅली काढण्याचे ठरवले आहे. वाढीव वाहतूक दर मिळेपर्यंत खनिज वाहतूक सुरू करू देणार नसल्याची संघटनेची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्रकमालकांचे आंदोलन खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच खाणपट्ट्यातील आमदारांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केल्यामुळे आंदोलनाबाबत अनिश्चितता वाढली आहे.
आठ-दहा दिवस अखिल गोवा ट्रकमालक संघटना खनिज वाहतुकीसाठी वाढीव दर मिळावा यासाठी बॉम्बे रोड-पाळी जंक्शन येथे आंदोलन करीत आहे. आंदोलनाला स्थानिक आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनीही पाठिंबा दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी खाणपट्ट्यातील आमदारांचे वैयक्तिक हितसंबंध खाण व्यवसायाच्या आड येऊ न देण्याची तंबी दिल्यामुळे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांचीही कोंडी होण्याची शक्यता आहे. आ. सावंत यांनी माघार घेतल्यास ट्रकमालकांचे आंदोलन फार काळ टिकणार नसल्याची चर्चाही खाणपट्ट्यात सुरू आहे.
खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नुकतेच उत्तर गोवा ट्रकमालक संघटनेचे माजी अध्यक्ष शांबा गावस यांना खनिज वाहतुकीसंदर्भात चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. उत्तर गोवा ट्रकमालक संघटनेचे पदाधिकारी त्यानुसार मुख्यमंत्र्यांना भेटूनही आले. मात्र, संघटनेची मुख्यमंत्र्यांशी काय बोलणी झाली याचा तपशील मिळू शकला नाही. सध्या तरी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी अखिल गोवा ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस तसेच अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात कोणतेही स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. तूर्त आंदोलन मागे घ्या, नंतर काय ते पाहू, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
महिनाभरात ट्रकमालकांचे आंदोलन विविध वळणांवरून गेल्याचे दिसते. अनेक वर्षे खाण वाहतुकीचे कंत्राट घेणारे शांबा गावस यांनी ट्रकमालकांच्या असंतोषामुळे उत्तर गोवा ट्रकमालक संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला
होता.
प्राप्त माहितीनुसार शांबा गावस हे साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सांवत यांचे राजकीय शत्रू असून येणाऱ्या २0१७च्या निवडणुकीत शांबा गावस हे डॉ. सावंत यांच्या विरोधात लढण्याची तयारी करीत आहेत. शांबा गावस यांची उमेदवारी डॉ. प्रमोद सावंत यांना अडचणीची ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही स्थितीत शांबा गावस यांना खाणपट्ट्यात वरचढ ठरू न देण्याचा चंग डॉ. सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. शांबा गावस यांची खरी ताकद असलेल्या ट्रकमालकांना आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याकडे वळवण्याची खेळी डॉ. सावंत खेळत असल्याची चर्चाही खाणपट्ट्यात सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी खाणपट्ट्यातील आमदारांना दिलेल्या तंबीमुळे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांची गोची होण्याची शक्यता आहे. शांबा गावस यांना मात्र राजकीय प्रवासासाठी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात खाणपट्ट्यातील मागील अनेक आंदोलनांवेळी शांबा गावस यांनी ट्रकमालकांची भूमिका सरकार तसेच खाण कंपन्यांकडे व्यवस्थित मांडली होती.
यामुळेच त्यांना ट्रकमालकांचा तसेच अन्य खाण अवलंबितांचा पाठिंबा मिळत होता. सध्या शांबा गावस ट्रकमालकांच्या आंदोलनात सक्रिय नसल्यामुळे अखिल गोवा ट्रकमालक संघटनेतर्फे त्यांना एकप्रकारे खलनायकाप्रमाणे रंगवले जात आहे. सरकार दरबारी मात्र शांबा गावस यांना झुकते माप मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या खाणपट्ट्यातील मतदारसंघात ट्रकमालक संघटनेचे आंदोलन महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.