कोंकणीसाठी न भूतो असे कार्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2025 16:28 IST2025-01-26T16:28:13+5:302025-01-26T16:28:57+5:30
कोंकणी भाषा मंडळाच्या युवा महोत्सवास डिचोलीत प्रारंभ, विविध उपक्रमांचे आयोजन

कोंकणीसाठी न भूतो असे कार्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : मुख्यमंत्री या नात्याने यापूर्वी कोंकणीसाठी कोणीच केले नाही एवढे कार्य केलेले असून या अंतर्गत सरकारी कारभारात वापर, कर्मचारी भरतीमध्ये कोंकणीला स्थान तसेच देश आणि जागतिक पातळीवर कोंकणी भाषा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी केले.
कोंकणी भाषा मंडळ, युवा जैतिवंत दिवचल आणि नारायण झांट्ये वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २६ वा गोवा युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री सावंत बोलत होते. मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते कल्पवृक्षला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर समितीचे स्वागत अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रमुख पाहुणे आमदार प्रेमेंद्र शेट, कोंकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला दिवकर, उपाध्यक्ष रूपेश ठाणेकर, प्राचार्य राजेंद्र कुंभारजुवेकर, आनंद बांबोळकर, तन्वी पळ, मानसी पावसकर उपस्थित होते.
वेळी राजेंद्र कुंभारजुवेकर, रूपेश ठाणेकर यांनी मार्गदर्शन केले. मंडळ अध्यक्ष दिवकर यांनी युवा शक्तीमुळे कार्य वाढत असून म्हादईसाठी संघर्ष, कोंकणी शाळा सुरू करण्यासाठी युवा कार्यरत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते नंदन कुंकळ्ळकर यांना युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला, ओंकार चारी यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या नायर, ब्रिजेश शेट्ये यांनी केले.
युवकांना संधी
आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणे गरजेचे असून कोंकणीचे कार्य, साहित्य, भाषा पुढे नेण्यासाठी सरकार कुठेच कमी पडलेले नाही. युवकांना नवनवीन संधी उपलब्ध करण्यासाठी माझे सरकार कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी बोलताना म्हणाले.
गोमंतकीयांच्या हिताचे व्रत
मी पूर्णवेळ जनतेसाठी काम करण्याचे व्रत घेऊन काम करतोय. रुसवे-फुगवे मनात न धरता, हेवेदावे बाजूला ठेवून गोमंतकीयांच्या हितासाठीच माझे काम सुरू आहे. त्यासाठी माझी कोणीच पाठ थोपटत नसेल किंवा माझी कोण बाजूही घेत नसले तरी मला त्याची पर्वा नाही. मी प्रामाणिक जनसेवक म्हणून राज्याची धुरा समर्थपणे सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहे. यापुढेही कोंकणींच्या सेवेसाठी गोमंतकीय युवाशक्तीच्या हितासाठी माझे कार्य चालू राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ऐनवेळी निमंत्रण तरीही...
युवाशक्ती ही देशाचे प्रेरणास्थान असून त्यांनी साहित्य, शिक्षण आणि संस्कृती जतन करीत युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्रतिभेला प्रोत्साहन द्यावे, हा महोत्सवाचा हेतू आहे. कोंकणी भाषा मंडळाला सर्व प्रकारचे सहकार्य दिलेले असून कुठेच आपण कमी पडलेला नाही. युवा कोंकणी महोत्सवात मला ऐनवेळी निमंत्रण देऊनही कोणत्याही प्रकारचा इगो न बाळगता कोंकणीच्या सेवेसाठीच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
सांगितल्याशिवाय करणार कसे?
यापूर्वी कोणीही केलेले नाही, अशा प्रकारचे कार्य कोंकणीच्या उत्कर्षासाठी आपण केलेले आहे. यासाठी मी माझी पाठ थोपटून घेणार नाही. परंतु स्वतः सांगितल्याशिवाय आपण काय केले ते दुसरा सांगणार नाही म्हणून विविध कार्यांचा उल्लेख केल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
व्यसनापासून सावधान : आमदार शेट्ये
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी स्वागत करताना सांगितले की, कलेची भूमी असलेल्या डिचोलीत युवा शक्तीचा गजर निनादत असून योग्य संस्कार, आचारविचार यांचे पालन करीत देशाच्या जडणघडणीत युवाशक्तीने योगदान द्यावे. पदवीबरोबरच समाज, देश महत्त्वाचा असून जीवनाच्या परीक्षेत यश मिळावे, यासाठी युवाशक्तीने योगदान द्यावे. अमलीपदार्थांचा सुळसुळाट गावाच्या वेशीवर आलेला असून युवकांनी त्या विरोधात आवाज उठवत व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहनही केले. आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले की, युवा उत्सव ऊर्जा आणि सामर्थ्य याचा असून गोवा आणि केंद्र सरकार तरुणाईची काळजी घेत आहे. देश प्रगतिपथावर नेण्यासाठी युवा शक्ती संघटित होणे गरजेचे असून अपयशाला न घाबरता त्यामागे दडलेल्या यशाचा पाठलाग करावा. याचे भान युवाशक्तीने ठेवावे आणि योग्य मार्गक्रमण करावे. दोन दिवसांच्या या महोत्सवात कोंकणी पॉप, लोकमांड, लोकनृत्य, पारंपरिक वेश, प्रश्नमंजूषा स्पर्धा, भित्तिपत्रक, (फासकी) रंगीत खोमीज डिजिटल आर्ट, पारंपरिक वाद्यांची जुगलबंदी, लोकनाट्य, पथनाट्य, ट्रियो स्पर्धा होणार आहेत.