एकात्मतेला धोका
By Admin | Updated: December 30, 2014 01:20 IST2014-12-30T01:16:20+5:302014-12-30T01:20:13+5:30
फिलिप नेरी फेर्राव : अल्पसंख्याकांसाठी चिंतादायक

एकात्मतेला धोका
पणजी : गोव्यात समस्या नाही; पण उर्वरित भारतामध्ये काही चिन्हे अशी दिसू लागली आहेत की, ज्यामुळे अल्पसंख्याकांना चिंता करावीशी वाटते. जातीय तेढ देशाच्या एकात्मतेला बाधक आहे. जातीय संघर्षात देश कधी संघटित राहू शकत नाही, असे विधान गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांनी केले.
नाताळ व नववर्षानिमित्त आल्तिनो येथील आर्चबिशप पॅलेसमध्ये सोमवारी वार्षिक स्नेहमेळावा पार पडला. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून स्नेहमेळाव्याचे उद््घाटन करण्यात आले. आर्चबिशपांनी सर्वांना नाताळ व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्या वेळी सर्वांना उद्देशून बोलताना आपल्या भाषणात आर्चबिशप म्हणाले की, जुनेगोवे येथे सेंट झेवियर शवदर्शन सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडत आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी याबाबत मोलाचे सहकार्य केले.
या वेळी मुख्यमंत्री पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार रोहन खंवटे, लवू मामलेदार, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, माविन गुदिन्हो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो, मुख्यमंत्र्यांचे संयुक्त सचिव सदानंद शेट तानावडे आदी उपस्थित होते. या वेळी भगवान येशू ख्रिस्ताची महती सांगणारी गाणी सादर केली गेली. (खास प्रतिनिधी)