गणवेश, रेनकोट,

By Admin | Updated: June 6, 2014 01:55 IST2014-06-06T01:51:46+5:302014-06-06T01:55:43+5:30

सदगुरू पाटील ल्ल पणजी नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी व पालकांची गैरसोय सुरू झाली आहे.

Uniform, Raincoat, | गणवेश, रेनकोट,

गणवेश, रेनकोट,

सदगुरू पाटील ल्ल पणजी
नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी व पालकांची गैरसोय सुरू झाली आहे. गणवेश, रेनकोट व वह्यांचा पत्ताच नाही, असा अनुभव या वर्षीही विद्यार्थी व पालकांना आला आहे.
या वर्षी जेव्हा नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल, तेव्हा अगोदरच शाळांमध्ये गणवेश, रेनकोट वगैरे साहित्य पोहोचलेले असेल, असे सरकारने यापूर्वी जाहीर केले होते; पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. पावसाळा आता सुरू होत असतानाच आमच्या मुलांकडे गणवेश नाही असा अनुभव या वेळीही आम्हाला येत आहे, असे काही पालकांनी सांगितले. अजून गट शिक्षणाधिकार्‍यांच्याच कार्यालयात रेनकोट, गणवेश, वह्या असे साहित्य पोहोचलेले नाही. गट शिक्षणाधिकार्‍यांकडे हे साहित्य पोहचेपर्यंत जुलै महिना उजाडेल. त्यानंतर भागशिक्षणाधिकारी ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते करेपर्यंत आणखी एक-दोन आठवडे जातील, हे स्पष्ट आहे.
गणवेश हे सरकारी प्राथमिक शाळांमधील पहिली व तिसरी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना दिले जातात. रेनकोट आणि वह्यांचे वाटप अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना केले जाते. मात्र, या वेळी अजून वह्या नाहीत, रेनकोट आणि गणवेशही नाही, अशी माहिती मिळाली. शिक्षण खात्याने याला दुजोरा दिला. आम्ही यापुढे या सगळ्या साहित्याचा पुरवठा करू, असे खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले. यापूर्वीच्या काळातील वार्षिक अनुभव लक्षात घेऊन शिक्षण खात्याने पूर्वनियोजन आणि व्यवस्था करायला हवी होती; पण तसे घडले नाही, असे पालकांचे मत आहे. पावसात मुलांना भिजत जावे लागते. सरकार रेनकोट देईल म्हणून पालकही रेनकोट विकत घेत नाहीत. ग्रामीण भागातील काही पालकांची तर आर्थिक स्थितीच रेनकोट, गणवेश वगैरे खरेदी करण्यासारखी नसते, असे काही शिक्षकांचेही म्हणणे आहे.
रेनकोटबाबत विलंब झाल्यानंतर आता शिक्षण खात्याने मुलांना कुपन द्यायचे ठरवले आहे. ते कुपन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी बाजारातून स्वत:ला हवा तो रेनकोट खरेदी करायचा, असे तत्त्वत: शिक्षण खात्याने ठरवले आहे. हीच पद्धत शिक्षण खात्याने यापूर्वीच सुरू केली असती, तर एव्हाना विद्यार्थ्यांच्या हाती कुपन्स तरी पोहोचली असती. शिक्षण खात्याने रेनकोट, गणवेश, वह्या किती विद्यार्थ्यांना लागतील, याचा अंदाज घेण्यासाठी विद्यालयांमधील विद्यार्थी संख्या गेल्या शुक्रवारी गट शिक्षणाधिकार्‍यांकडून मागवून घेतली.

Web Title: Uniform, Raincoat,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.