सावधान... शिवरायांचा अनादर करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 13:20 IST2025-03-02T13:18:54+5:302025-03-02T13:20:37+5:30

गोवा आणि छत्रपतींचे नाते खूप मोठे आहे. छत्रपतींच्या विरोधकांनी सप्तकोटेश्वर मंदिरात जाऊन बसणे गरजेचे आहे. गोवा म्हणजे केवळ सासष्टी तालुका नव्हे, हे उत्तर गोव्यात फिरताना कळते. गोव्यातील काही तालुक्यांत शिवशाही होती की नाही यावर सविस्तर चर्चा करता येईल, पण छत्रपतींना अप्रत्यक्षपणे व्हिलन ठरवून नव्हे हे लक्षात घ्यावे लागेल.

uday bhembre statement and be careful do not disrespect chhatrapati shivaji maharaj | सावधान... शिवरायांचा अनादर करू नका

सावधान... शिवरायांचा अनादर करू नका

सदगुरू पाटील, संपादक, गोवा

छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की काही ठरावीक व्यक्तींचा (किंवा काही कोंकणीवाद्यांचा) पोटशूळ उठतो. गोव्यातील हिंदू बहुजनांसाठी छत्रपती शिवाजी व संभाजी दैवत आहेत, हे मान्य करावेच लागेल. हे एकदा मान्य झाले की मग कधी आडून, कधी अप्रत्यक्षपणे छत्रपतींचा अनादर करण्याचे धाडस कुणाला होणार नाही. आम्ही हे केवळ काल-परवाची घटना डोळ्यांसमोर ठेवून लिहीत नाही. गेल्या तीस वर्षांतील काही ठरावीक व्यक्तींची विधाने, गोव्यातील विविध घटना, भाषावाद, शिवरायांचे पुतळे, मातृभाषा आंदोलन व अन्य अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर लिहीत आहोत. महाराष्ट्रात विलीन होण्यापासून आम्ही गोव्याला वाचवले म्हणून आम्हीच स्वाभिमानी गोंयकार आहोत असा दावा जे करतात, त्या दाव्यांना कधी तरी आव्हान देण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांचे पुतळे उभे झाले तरी आणि छत्रपतींच्या जयंतीदिन सोहळ्यात कुणी व्यासपीठावरून अर्धी कच्ची मराठी बोलले तरी काहीजणांच्या पोटात दुखते. शिवजयंतीला तरुणांनी फेटे बांधले तरी काही कोंकणीवादी नाके मुरडतात आणि शिवरायांविषयी कुणी जास्त चांगली माहिती दिली, तर पुरावे मागितले जातात. एक ठरावीक गटच शिवरायांविषयी वाकडा विचार करतोय, ही गोष्ट वारंवार नजरेस येत आहे.

मराठीला गोवा राजभाषा कायद्यात जे काही दिलेय ते देखील द्यायला नको होते किंवा ते काढून घ्यायला हवे, अशा अर्थाचे विधान मध्यंतरी याच इकोसिस्टममधील एका नेत्याने केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उदय भेंब्रे यांच्या तथाकथित ऐतिहासिक सत्याकडे पाहावे लागेल. भेंब्रे स्वतः इतिहास संशोधक नाहीत. बाबासाहेब पुरंदरेंप्रमाणे त्यांनी छत्रपतींचा अभ्यास केलेला नाही. तरीदेखील काही पुस्तके वाचून, काही ऐतिहासिक संदर्भ वाचून त्यांनी छत्रपतींविषयी स्वतःचे मत बनविले आहे. ते त्यांचे मत गोव्यातील अनेकांना पटत नाही, हे येथे नमूद करावे लागेल. तुम्ही चांगले माणूस आहात म्हणजे तुम्ही बोलता ते सगळेच सत्य आहे, असे आजच्या युवकांनी समजण्याचे कारण नाही. 

सातत्याने छत्रपती शिवरायांविषयी चुकीचे व गैर बोलणाऱ्या लेखकांना जर जमावाने जाब विचारला तर जमावाचा दोष किती काळ धरायचा? अर्थात रात्रीच्यावेळी ८०-८५ वर्षीय लेखकाच्या घरी जाऊन तिथे वाद घालण्याचे कृत्य कुणीच करू नये. शिवप्रेमींनी किंवा अन्य कुणीच तसे वागू नये. तसे वागणे शोभणारेही नाही. उदय भेंब्रे यांच्या विधानांचे खंडन किंवा त्यावर युक्तिवाद हे सभ्य पद्धतीने एखाद्या चर्चात्मक कार्यक्रमात करता आले असते. किंवा शिवप्रेमींनी लेख लिहून किंवा एखाद्या ठिकाणी मुलाखत देऊन भेंब्रे यांच्या विधानांचा समाचार घेता आला असता. रात्रीच्यावेळी त्यांच्या घरी जाणे हे अत्यंत चुकीचे आहे. मात्र आता काळ बदललाय व शिवरायांच्या गोव्यातील काही मोजक्या विरोधकांनादेखील आता लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल, याची जाणीव उदय भेंब्रे यांनादेखील निश्चितच झाली असेल.

उदय भेंब्रे यांनी कोंकणीसाठी दिलेल्या योगदानाविषयी सर्वांनाच आदर आहे. ओपिनियन पोल चळवळीत भेंब्रे व इतरांनी घेतलेल्या कष्टांमुळे गोवा स्वतंत्र राज्य राहू शकला. एक व्यक्ती किंवा एक वकील म्हणूनही भेंब्रे यांच्याविषयी खूप आदर आहे. भेंब्रे कधीही कुणालाही कुठे भेटले तर शांतपणे, सोज्वळपणे बोलतात. तिथे ते कोण मराठीवादी किंवा कोण कोंकणीवादी असाही भेदभाव करत नाहीत. मात्र जेव्हा भाऊसाहेब बांदोडकर किंवा जेव्हा शिवाजी-संभाजी आदी महापुरुषांचा विषय येतो, तेव्हा भेंद्रे यांचे दावे द्वेषपूर्ण वाटू लागतात. मध्यंतरी बांदोडकर यांचे नाव न घेता त्यांनी एक व्हिडीओ काढला. मगो पक्षाला खूप दूषणे देताना बांदोडकरांची कारकीर्द कशी गोव्याचे मोठे नुकसान करणारी ठरली, वगैरे मुद्दे त्यांनी मांडले होते. भेंद्रे यांच्या त्या दाव्यांबाबतही गोमंतकीय बहुजन समाजाकडून नापसंती व्यक्त झाली. समजा बांदोडकर यांच्याऐवजी जॅक सिक्वेरा किंवा पुरुषोत्तम काकोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले असते, तर जमीन सुधारणा कायदे आले असते काय? गावोगावी मराठी शाळा सुरू करून भारतीय संस्कृतीचे संवर्धन केले गेले असते काय? असे प्रश्न त्यावेळी काही तरुणांनी भेंब्रे यांना विचारले होते. काहीजणांनी त्यावेळी लेख लिहिले. आता काही युवक रात्रीच्यावेळी थेट त्यांच्या घरीच गेले. भेंब्रे यांच्या घरी रात्री जाण्याची किंवा वाद घालण्याची गरजच नव्हती.

मात्र भेंब्रे यांनी छत्रपती शिवरायांविषयी अलीकडे व्हिडीओतून जे दावे केले आहेत, ते एकतर्फी आहेत. ठरावीक इतिहासकारांची नावे घेऊन ते बोलले आहेत. भेंब्रे यांनी अर्धसत्य सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे शिवप्रेमी खवळले आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. बार्देशविषयी, धर्मांतराविषयी किंवा छत्रपती-पोर्तुगीज संबंधांविषयी भेंद्रे यांनी पूर्ण माहिती कधी सांगितलेलीच नाही. सोयीची माहिती सांगितली जाते. सेंट झेवियरविषयी मध्यंतरी वाद निर्माण झाला. त्यावेळीही एक व्हिडीओ आला होता. गोव्यात इन्क्विझीशन यायला हवे म्हणून सेंट झेवियरने पत्र लिहिले होते ही गोष्ट का लपवून ठेवली जाते? पत्र उपलब्ध आहे की नाही ते संबंधितांनी एकदा सांगावे.

छत्रपतींच्या विरोधकांनी काहीकाळ नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिरात जाऊन बसणे गरजेचे आहे. मराठी प्राथमिक शिक्षणामुळे गोव्याची हानी झाली, असेही मध्यंतरी एकाने (भेंब्रे यांनी नव्हे) म्हटले होते. गोवा म्हणजे केवळ सासष्टी तालुका नव्हे, हे उत्तर गोव्यात फिरताना कळते. गोव्यातील काही तालुक्यांत शिवशाही होती की नाही यावर सविस्तर चर्चा करता येईल, पण छत्रपतींना अप्रत्यक्षपणे कमी लेखून नव्हे हे लक्षात घ्यावे लागेल.

ओपिनियन पोलमध्ये जॅक सिक्वेरा आदी नेते जिंकले, पण गोव्याची जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचली नाही, लोक भाऊंनाच घेऊन नाचले, हिंदू बहुजन समाजाने आपल्या हृदयात देवाचे स्थान दिले, ते भाऊसाहेब बांदोडकर यांनाच, हे लक्षात घ्यावे लागेल. गोव्यातील हिंदू समाज हदू समाज छत्रपती शिवरायांनाच दैवत मानतो, त्यामागील सूत्रही शिवरायांच्या काही विरोधकांना कधी तरी समजून घ्यावे लागेल. बार्देशात शिवरायांनी स्वारी केल्यानंतर त्यांच्या सैनिकांनी महिला व मुलांनाही उचलून नेले होते, असे अत्यंत आक्षेपार्ह विधान उदय भेंद्रे यांनी केले आहे. शिवरायांना जाणूनबुजून व्हिलन ठरवण्याचा हा प्रयत्न नव्हे का?

भेंब्रे यांच्या काही दाव्यांना सचिन मदगे यांनी वारंवार उत्तर दिलेले आहे. छत्रपतींनी बार्देशात पोर्तुगीजांविरुद्ध लढाई केली होती. शिवाजी-संभाजी यांना जास्त आयुष्य लाभले असते तर गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून लवकर मुक्त झाला असता, हे अभिमानाने व मोठ्या आवाजाने भेंब्रे यांनी कधी तरी सांगायला हवे.

छत्रपतींनी बार्देश व साष्टी प्रांतात एकेकाळी आपले सैन्य घुसविले होते, त्यावेळी ते भाग पोर्तुगीजांच्या तावडीत होते. पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांची तर प्रचंड धास्ती घेतली होती. शिवरायांचा, संभार्जीचा गोव्याशी वारंवार संबंध आल्याचे दाखले इतिहासात मिळतात.

डिचोली तालुक्याशी व बार्देशशी छत्रपतींचे जे नाते होते, त्याचा अभ्यास आजच्या तरुणांनी करायला हवा. मात्र ज्यांच्याकडून सत्य कथनाची अपेक्षा असते ते अर्धवट इतिहास सांगू लागले व अप्रत्यक्ष छत्रपतींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न करू लागले, तर आजच्या तरुणांकडून कधी तरी प्रश्न विचारले जातीलच.

शिवरायांचा गोव्याशी काहीच संबंध नव्हता, मग त्यांची जयंती किंवा त्यांचे पुतळे गोव्यात कशाला असे विचारणारे कथित विचारवंत आपल्याकडे आहेतच. गोवा आणि छत्रपतींचे नाते खूप मोठे आहे.
 

Web Title: uday bhembre statement and be careful do not disrespect chhatrapati shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.