तियात्रिस्तांचा आवाज दडपण्याचा प्रकार
By Admin | Updated: August 5, 2014 01:47 IST2014-08-05T01:46:56+5:302014-08-05T01:47:57+5:30
पणजी : पर्रीकर सरकारच्या राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेले नाही, असा आरोप करत आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावच्या रवींद्र भवनात

तियात्रिस्तांचा आवाज दडपण्याचा प्रकार
पणजी : पर्रीकर सरकारच्या राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेले नाही, असा आरोप करत आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावच्या रवींद्र भवनात तियात्रिस्तांकडून घेतल्या जात असलेल्या हमिपत्राबद्दल कडाडून टीका केली.
कला व संस्कृती खात्याच्या अनुदान मागण्यांवेळी ते बोलत होते. तियात्रांमधून सरकार, मंत्री, आमदार किंवा अतिमहनीय व्यक्तींवर कोणतीही टीका करणार नाही, असे लेखी लिहून घेतले जाते. टीका केल्यास पुढे बुकिंग दिले जाणार नाही, अशीही भीती घातली जाते. ही अघोषित आणीबाणीच आहे, असे सरदेसाई म्हणाले. एकीकडे तियात्रिस्तांना अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे अशा पद्धतीने त्यांची तोंडे बंद करायची हा कुठला न्याय, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
या रवींद्र भवनात आर्थिक गोलमालही चालू आहे. साडेचार कोटी खर्च केले. त्यातील अनेक व्यवहार प्रश्न उपस्थित करण्यासारखे आहेत. निवडणूक आचारसंहितेच्या काळातही खर्च करण्यात आल्याचे सरदेसाई म्हणाले.
दरम्यान, आमदार बेंजामिन सिल्वा, मिकी पाशेको यांनी तियात्रिस्तांवरील बंधनांचे स्वागत केले. काही तियात्रिस्त राजकारण्यांकडून पैसे घेऊन कांतारा रचतात, असा आरोप आमदार कायतान सिल्वा यांनी केला. मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी आरोपाला उत्तर देताना खात्याने तियात्रिस्तांकडून हमिपत्र घ्यावे, यासाठी कोणतेही परिपत्रक काढलेले नसल्याचा खुलासा सभागृहात केला. (प्रतिनिधी)