उपद्रवी प्राण्यांवर येणार संक्रांत!
By Admin | Updated: January 14, 2016 03:04 IST2016-01-14T02:55:30+5:302016-01-14T03:04:10+5:30
पणजी : शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणारे काही वन्यप्राणी हे उपद्रवी प्राणी म्हणून जाहीर करण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत

उपद्रवी प्राण्यांवर येणार संक्रांत!
पणजी : शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणारे काही वन्यप्राणी हे उपद्रवी प्राणी म्हणून जाहीर करण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. माकड, डुक्कर अशा काही प्राण्यांविषयी तसा विचार सुरू असल्याचे पार्सेकर यांनी सूचित केले.
सगळ्याच गोष्टी सभागृहात खुलेआम बोलता येत नाहीत. मात्र, माझी वन खात्याशी चर्चा सुरू आहे. काही प्राणी शेतकऱ्यांना खूप त्रास देतात, हा विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांचा उल्लेख बरोबर आहे. काही प्राण्यांना उपद्रवी प्राणी म्हणून जाहीर करण्याची आता वेळ आलीच आहे. आम्ही त्यासाठी पावले उचलत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राणे यांनी सत्तरीतील वाढत्या माकडतापाच्या रुग्णांविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. माकडे, खेती, गवे, रानटी डुक्कर यांच्याकडून शेतकऱ्यांची
पिके उद्ध्वस्त केली जात आहेत.
शेतकरी त्यामुळे अस्वस्थ आहेत,
असा मुद्दा राणे यांनी मांडला. काही राज्यांनी डुक्कर, माकडे वगैरे उपद्रवी प्राणी म्हणून जाहीर केले आहेत. आफ्रिकेत तर हत्तींचीदेखील हत्या करण्यास मान्यता आहे. अन्य राज्यांप्रमाणे गोवा सरकारही पावले का उचलत नाही, अशी विचारणा राणे यांनी केली होती.
माकडतापाविषयी बोलताना राणे यांनी, उपाययोजना करण्याबाबत आरोग्य खाते कमी पडते, असा मुद्दा मांडला. आतापर्यंत माकडतापाचे सत्तरी तालुक्यात ३० रुग्ण सापडले. त्याविरुद्ध मुळापासूनच उपाययोजना करायला हवी. आरोग्य खाते लोकांना पांढरे कपडे घालण्याची सूचना करते. या सूचना ‘नॉन प्रॅक्टिकल’ आहेत, असे राणे म्हणाले.
(खास प्रतिनिधी)