अपंग व्यक्तीची ६६ किमी अंतरावरील संस्थेत बदली
By Admin | Updated: December 9, 2015 02:10 IST2015-12-09T02:10:06+5:302015-12-09T02:10:17+5:30
अपंग व्यक्तीची ६६ किमी अंतरावरील संस्थेत बदली

अपंग व्यक्तीची ६६ किमी अंतरावरील संस्थेत बदली
पणजी : अपंग व्यक्तींच्या कल्याणाची भाषा एका बाजूने सरकारी खाती बोलतात व त्यासाठी मोठे सोहळेही आयोजित करून सत्ताधारी भाषणे देत विशेष व्यक्तींचे गौरवही करतात; पण दुसऱ्या बाजूने सरकारी खाती व एकूणच शासकीय यंत्रणा अपंग व्यक्तींबाबत अतिशय असंवेदनशील बनल्याचा अनुभव येत आहे. सत्तरी तालुक्यातील मोर्ले कॉलनी येथून रामकृष्ण गावस या अपंग सरकारी कर्मचाऱ्याची बदली ६६ किलोमीटर दूर म्हणजे वास्को येथे करण्यात आली असून त्याने याविषयी तक्रार करून न्यायाची मागणी केली, तरी संबंधित सरकारी खात्याच्या संचालकांनी अजून याची दखल घेतलेली नाही.
हा विषय ‘लोकमत’ने मंगळवारी आयटीआयशी निगडित क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांच्या नजरेस आणून दिला असता, आपण या विषयात गंभीरपणे लक्ष घालून बदली रद्द करीन, अशी ग्वाही ढवळीकर यांनी दिली.
रामकृष्ण गावस हे अगोदर पणजीत क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग खात्याच्या मुख्यालयात काम करत होते. तिथून त्यांची वास्कोत बदली करण्यात आली. पणजीत येण्यासाठी व पुन्हा मोर्ले येथे जाण्यासाठी बसगाड्या आहेत. त्यामुळे आपली पणजीत येण्यास तक्रार नव्हती, असे गावस यांचे म्हणणे आहे. तथापि, आता त्यांची बदली वास्को येथे करण्यात आली आहे. चार बसगाड्या बदलून आपल्याला जावे लागते. सायंकाळी सात वाजल्यानंतर साखळीहून आपल्या घरी मोर्ले कॉलनी येथे जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्थाच नाही. त्यामुळे आपण वास्कोत कामालाच जाऊ शकत नाही, असे गावस यांनी सांगितले. आपली लेखी तक्रार त्यांनी खात्याच्या संचालकांपर्यंत पंधरा दिवसांपूर्वीच पोहचवली आहे. गावस यांच्या पायास ४२ टक्के अपंगत्व आहे; पण खात्याच्या संचालकांनी अजून तक्रारीची दखल घेतलेली नाही, अशी माहिती मिळाली.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सतीश सोनक यांनी सरकारच्या असंवेदनशीलतेचा निषेध केला. (पान २ वर)