Goa Lairai Devi Stampede: गोव्यातील शिरगावात लईराई देवीच्या प्रसिद्ध जत्रोत्सवास सुरुवात झाली. देवी लईराईच्या जत्रोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून धोंड आणि भाविक दर्शनासाठी दाखल झाले. सिंधुदुर्ग आणि अन्य सीमावर्ती भागातूनही भाविक या जत्रोत्सवासाठी दाखल झाले होते. लईराई देवीचा जत्रोत्सवाला हजारो भाविक हजेरी लावतात. परंतु, या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या चेंगराचेंगरीत ६ भाविकांचा मृत्यू झाला असून, सुमारे ३० ते ४० जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. जखमी भाविकांना डिचोली आरोग्य केंद्र, म्हापसा जिल्हा रुग्णालय आणि गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये २ महिला, २ पुरुष आणि एका १७ वर्षीय युवकाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. २० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी सध्या बचाव कार्य सुरू आहे. तर दुसरीकडे, लईराई मंदिरात संशयास्पद हालचालींप्रकरणी २३ संशयितांना ताब्यात घेतले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ड्रोन आणि साध्या वेशातील अधिकारी तैनात केले आहेत.
यात्रेच्या पहिल्याच दिवशी या उत्सवाला गालबोट लागले
शुक्रवार, ०२ मे २०२५ पासून शिरगाव येथे लईराई देवीच्या प्रसिद्ध जत्रोत्सवाला गोव्यासह शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या जत्रेला मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी करत असतात. दरम्यान, यात्रेच्या पहिल्याच दिवशी या उत्सवाला गालबोट लागले आहे. आमदार चंद्रकांत शेट्ये, पेमेंद्र शेट आणि जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि जखमींची भेट घेण्यासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. शिरगाव येथील लैराई जत्रा येथे झालेल्या दुःखद चेंगराचेंगरीमुळे खूप दुःख झाले. जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात गेलो आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत याची खात्री करण्यासाठी मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी संवाद साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि या कठीण काळात पूर्ण पाठिंबा दिला, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, या जत्रोत्सवात जखमी झालेल्यांपैकी ८ जणांची प्रकृती अधिक चिंताजनक असून, त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) येथे पाठवण्यात आले. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, अतिरिक्त डॉक्टर तैनात करण्यात आले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी जीएमसी आणि असिलो रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.