खोतीगाव : शहाण्याने कोर्टाबरोबर पोलीस स्थानकाची पायरी चढू नये आणि याच भीतीपोटी ग्रामीण भागातील लोक पोलिसांपासून दूर राहात; पण काणकोण पोलिसांनी मात्र स्थानकात दरवर्षी इको फ्रेंडली पद्धतीने आकर्षक देखावा करून शहाण्याबरोबर ग्रामीण लोकांनाही पोलीस स्थानकाची पायरी चढण्यास भाग पाडले आणि ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून ते पार पाडतात. यंदा काणकोण पोलिसांनी श्रावणबाळ आई-वडिलांना कावडीतून नेऊन सेवा करणारा देखावा उभारून वडिलांची सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर एकाबाजूने माटोळीच्या फळांनी भिंत उभारून त्यावर अर्धगोलाकार माटोळीचा साज चढविलेला असल्याने सध्या पोलीस स्थानकच अतिशय थंडगार हवेचे ठिकाण भासते. काणकोण तालुक्यात माटोळी स्पर्धेसाठी अनेकांनी विविधरीत्या माटोळ्या साकारल्या आहेत; पण काणकोण पोलिसांनी चक्क माटोळीच्या पद्धतीची साकारलेली भिंत ही इतर माटोळीपेक्षा वेगळेपण व नावीन्यपूर्ण कलाकृती असल्याने बघ्याचे एक आकर्षणच ठरलेले आहे. पोलीस स्थानकात पाच-सहा चौरस मीटर साकारलेल्या ह्या विविधांगी देखाव्यासाठी नैसर्गिकपणा येण्यासाठी काणकोण पोलिसांनी माती, गवत, दगड तसेच गवताची झोपडी साकारून कठड्यावरून वाहणाऱ्या झऱ्याचेही दर्शन घडविलेले आहे आणि त्यात हलचल करणारा असल्याने त्यात आकर्षणाची अधिकच भर पडलेली आहे. माटोळीचे आकर्षण व देखाव्याचे नावीन्यपूर्ण वेगळेपणा दाखविण्याचा प्रयत्न इतर सार्वजनिक मंडळांनी केला तरी पर्यावरणपूरक आकर्षकता दाखविण्यास काणकोण पोलीस स्थानक अग्रेसर आहे. सध्या या ठिकाणी आपण कित्येक वर्षांपासून प्रत्येक वर्षी नावीन्य करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्याला गणेशभक्ताकडून उत्सुकता लाभत असल्याने ह्या कामात एकप्रकारे प्रोत्साहन मिळत असून तीच खरी धन्यता व समाधान असल्याचे काणकोण पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
काणकोण पोलीस जपताहेत ‘इको फ्रेंडली’ची परंपरा
By admin | Updated: September 6, 2014 01:25 IST