वर्षअखेर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यामध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे. गोव्यातील सागर किनारे आणि हॉटेल पर्यटकांनी फुलून गेले आहेत. या उत्साही वातावरणादरम्यान, एक धक्कादायक घटना घडली आहे. गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये रात्री एक धक्कादायक घटना घडली. या हॉटेलमध्ये पर्यटक आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादावादीत आंध्र प्रदेशमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला. याबाबत गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यातील कळंगुट येथे ही घटना घडली. या प्रकरणी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका २३ वर्षीय कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
गोव्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रात्री मद्यधुंद अवस्थेतील पर्यटकांच्या एका गटाने हॉटेलमध्ये येऊन जेवण मागितले. तेव्हा त्या हॉटेलच्या मालकाने त्यांना किचन बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर या पर्यटकांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेला आक्षेपार्ह भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर या वादाचं पर्यावसान हाणामारीत झालं.
पोलिसांनी पुढे सांगितले की, यादरम्यान त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने पर्यटक रवी तेजा याच्या डोक्यावर दांडक्याने प्रहार केला. त्यामुळे त्या पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कळंगूट पोलिसांनी नेपाळमधील रहिवासी असलेल्या कमल सोनार या कामगाराला अटक केली. तर हॉटेल मालक आणि इतर दोघांचा शोघ घेण्यात येत आहे. आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.