बफर झोनमध्ये पर्यटन प्रकल्प!
By Admin | Updated: October 10, 2015 01:05 IST2015-10-10T01:05:29+5:302015-10-10T01:05:29+5:30
पणजी : राज्यातील बफर झोनमध्ये म्हणजेच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात इको टुरिझम व कृषी आधारित प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली जाणार आहे.

बफर झोनमध्ये पर्यटन प्रकल्प!
पणजी : राज्यातील बफर झोनमध्ये म्हणजेच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात इको टुरिझम व कृषी आधारित प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली जाणार आहे. त्यासाठी नगर नियोजन कायद्यात दुरुस्ती करणारा वटहुकूम जारी करण्याचा निर्णय पार्सेकर मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीनंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सविस्तर माहिती दिली. राज्यात पर्यटन वाढत आहे. त्यादृष्टीने नवनव्या सुविधाही आम्ही उभ्या करत आहोत. स्थानिक लोकांना त्यातून रोजगार संधी प्राप्त व्हावी असा हेतू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यासाठीच अभयारण्ये व अन्य ठिकाणी जे बफर झोन आहेत, त्या झोनमध्ये तंबू, रेस्टॉरंट्स व अन्य पर्यटन प्रकल्प व कृषी आधारित प्रकल्प उभे करता येतील. त्यासाठी बझर झोनमध्ये ज्या व्यक्तीचे किमान २० हजार चौरस मीटरचे क्षेत्रफळ असेल, त्या व्यक्तीला इच्छा असल्यास त्या वीस हजार चौरस मीटरपैकी पाच टक्के जागा या प्रकल्पांसाठी वापरण्यास दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नगर नियोजन कायद्यात यासाठी दुरुस्तीची गरज होती. शुक्रवारी जारी केलेला वटहुकूम मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे. २०१५-१६च्या अर्थसंकल्पात सरकारने या विषयीचे आश्वासन दिले होते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अग्निशमन सेवा संचालनालयात संगीत ब्रास बॅण्ड विभाग स्थापन केला जाईल. विविध सोहळ्यांसाठी त्याचा उपयोग होईल. त्यासाठी मंत्रिमंडळाने १८ कर्मचाऱ्यांची भरती मंजूर केली. पोलिसांचा वायरलेस विभाग बळकट केला जाईल. त्यासाठी या विभागात पोलीस उपनिरीक्षक पदापासून अन्य विविध प्रकारची ३८ पदे भरली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)