पणजी : अनेक वर्षांनंतर आता प्रथमच गोव्याचा पर्यटन उद्योग कोसळला आहे. केवळ विदेशीच नव्हे, तर देशी पर्यटकांची संख्याही घटली आहे. राज्यातील हॉटेल, शॅक व लहान-मोठ्या रेस्टॉरंटना याचा मोठा फटका बसला आहे. टूर अॅण्ड ट्रॅव्हल संघटनेचे माजी अध्यक्ष राल्फ डिसोझा यांच्या मते विदेशी पर्यटक संख्या ३५ टक्क्यांनी घटली. त्यांनी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर व पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन आमदार नीलेश काब्राल यांच्या उपस्थितीत ही माहिती शनिवारी येथे पत्रकारांना दिली. गोव्यात गेल्या पर्यटन मोसमात एकूण एक हजार १४१, तर यंदा आतापर्यंत केवळ साडेआठशे चार्टर विमाने दाखल झाली आहेत. आमदार काब्राल यांनी सांगितले की, चार्टर विमान संख्येत ३५ टक्क्यांची घट झाली; पण राल्फ यांच्या मते केवळ चार्टर विमान संख्याच नव्हे, तर एकूणच विदेशी पर्यटक संख्याच ३५ टक्क्यांनी घटली. गेल्या वर्षी चार्टर विमानांद्वारे सुमारे अडीच लाख विदेशी पर्यटक आले होते. राल्फ म्हणाले, की देशी पर्यटकांची संख्याही या वेळी घटली. या वेळच्या पर्यटन मोसमावेळी काही हॉटेल्स रिकामीच राहिली. दिल्ली-गोवा, तसेच मुंबई-गोवा असा विमान प्रवास मध्यंतरी प्रचंड महागल्याने देशी पर्यटकांनी हॉटेलांचे आरक्षण रद्द केले. आम्हाला गोव्यात विमानातून येऊन सुट्टी घालविणे परवडणार नाही. त्यामुळे आमचे हॉटेल आरक्षण रद्द करा व त्यासाठी आम्हाला जो भुर्दंड पडेल तो सोसायला आम्ही तयार आहोत, असे अनेक पर्यटकांनी सांगून गोव्याला रामराम ठोकला. राल्फ म्हणाले, इनक्रेडिबल इंडिया मोहिमेत गोव्याला महत्त्वाचे स्थान दिले जायला हवे. स्पर्धक राष्ट्रांनी विविध प्रकारच्या आकर्षक सवलती व सुविधा पर्यटकांना देणे सुरू केले आहे. गोव्यातील दाबोळी विमानतळावर रात्रीच्यावेळी पार्क करण्यासाठी विमानांना जागा मिळत नाही व त्यामुळे रात्री केवळ पार्किंगसाठीच विमानांना कधी बंगळुरूला तर कधी विदेशातही रिकामे जाऊन रिकामे यावे लागते. या सर्वांचा मोठा परिणाम पर्यटनावर झाला. मंत्री परुळेकर यांनी सांगितले, की रशियन पर्यटकांची संख्या खूप घटली. मात्र, या वेळी प्रथमच अमेरिकेतून ई-व्हिसा पद्धतीद्वारे पावणेतीनशे पर्यटक गोव्यात आले. आम्ही गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात सुविधा वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. दाबोळी विमानतळावरील पार्किंग, तसेच ई-व्हिसा पद्धत व अन्यबाबतीत ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्याची ग्वाही आम्हाला ताज्या दिल्ली भेटीवेळी संबंधित केंद्रीय मंत्र्यांकडून मिळाली आहे. केंद्राने चार्टर धोरण व व्हिसा शुल्काचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यादृष्टीने दिल्ली भेट खूप फलद्रूप ठरली. या वेळी पर्यटन खात्याचे संचालक अमेय अभ्यंकर म्हणाले, की गोवा हे एक राज्य असून या राज्याला अन्य राष्ट्रांशी स्पर्धा करावी लागते, हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. (खास प्रतिनिधी)
पर्यटन उद्योग कोसळला
By admin | Updated: January 18, 2015 01:41 IST