गोव्यात टॅक्सी व्यवसायिकांना खात्रीचा धंदा देण्यासाठी पर्यटन महामंडळाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 11:51 AM2018-10-05T11:51:56+5:302018-10-05T11:54:09+5:30

गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांना खात्रीचा धंदा मिळवून देण्यासाठी सरकारच्या गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) आता पुढाकार घेतला आहे.

Tourism Corporation's initiative to ensure taxi business in Goa | गोव्यात टॅक्सी व्यवसायिकांना खात्रीचा धंदा देण्यासाठी पर्यटन महामंडळाचा पुढाकार

गोव्यात टॅक्सी व्यवसायिकांना खात्रीचा धंदा देण्यासाठी पर्यटन महामंडळाचा पुढाकार

Next

पणजी -  गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांना खात्रीचा धंदा मिळवून देण्यासाठी सरकारच्या गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) आता पुढाकार घेतला आहे. महामंडळाने गोव्यात पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या टॅक्सी व्यावसायिकांकडून अर्ज मागविले असून त्यांना रोजगार संधी देण्याच्या दृष्टीने महामंडळाने योजना तयार केली आहे.

गोव्याचा नवा पर्यटन मोसम गुरुवारी (4 ऑक्टोबर) सुरू झाला आहे. रशियामधून पहिल्या चार्टर विमानाद्वारे शेकडो विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. गोवा पर्यटन विकास महामंडळ हे गोव्याच्या पर्यटनाला प्रोत्साहन देत पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी कार्यरत आहे. गोव्यात सुमारे वीस हजार टॅक्सी चालतात. या टॅक्सींमधून पर्यटकांना गोव्यात व गोव्याबाहेरही फिरविले जाते. गोव्याला वार्षिक सरासरी 70 लाख पर्यटक भेट देतात. तरी देखील काही टॅक्सी व्यवसायिकांना आवश्यक त्या प्रमाणात रोजगार संधी मिळत नाही. त्यांना पर्यटकांची वाहतूक करण्याची संधी मिळत नाही. या उलट काही टॅक्सी व्यवसायिक मात्र खूप पैसा कमावतात. आपल्याकडून जास्त प्रमाणात भाडेदर आकारण्यात आल्याची तक्रारही काहीवेळा पर्यटक करतात व यामुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायालाही गालबोट लागते. या पार्श्वभूमीवर पर्यटन विकास महामंडळाने सर्वच टॅक्सी व्यवसायिकांना खात्रीची रोजगार संधी मिळवून द्यावी व त्याचबरोबर पर्यटकांची लुबाडणूकही होणार नाही याची काळजी घ्यावी असे ठरवले. त्यानुसार योजना तयार झालेली आहे.

गोवा माईल्स ही अॅप आधारित टॅक्सी सेवा सुरू झालेली आहे. मात्र या सेवेसाठी टॅक्सींची संख्या कमी आहे. त्यामुळे या सेवेत अधिक टॅक्सींचा भरणा करण्यासाठी पर्यटन महामंडळाने टॅक्सी व्यवसायिकांकडून शुक्रवारी प्रस्ताव मागितले आहेत. केवळ गोवा माईल्सच नव्हे तर टूर, शॉर्ट टर्म भाडे, सरकारी वाहतूक, विशेष वाहतूक अशा पद्धतीने टॅक्सींना खात्रीचा धंदा मिळवून देण्यासाठी अर्ज मागविले आहेत. पर्यटन महामंडळाच्या सेवेत येणाऱ्या टॅक्सी व्यावसायिकांना महामंडळ दरमहा स्वत: ठराविक रक्कम देणार आहे.

Web Title: Tourism Corporation's initiative to ensure taxi business in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.