तिकिटांना ‘कॉर्नर’, फुटबॉलप्रेमी संतप्त
By Admin | Updated: December 15, 2014 01:23 IST2014-12-15T01:16:03+5:302014-12-15T01:23:35+5:30
चौकशीची मागणी : जाहिरात फलक पेटवला, शेडची मोडतोड

तिकिटांना ‘कॉर्नर’, फुटबॉलप्रेमी संतप्त
मडगाव : आयएसएल फुटबॉल स्पर्धेत बुधवारी १७ डिसेंबरला एफसी गोवा आणि अॅटलेटिको कोलकाता यांच्यात होणाऱ्या सेमीफायनलची तिकिटे संपल्याने अनेक फुटबॉल चाहत्यांचा हिरमोड झाला. तिकीट काउंटरवर तिकिटे संपल्याचे सांगितल्यानंतर संतप्त लोकांनी आपला राग पत्र्याच्या शेडवर काढला. त्यांची मोडतोड केली. जाहिरात फलकांनाही आग लावली. त्यामुळे वातावरण तंग बनले. मडगाव अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.
कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही घटनास्थळी जाऊन रांगेत रात्रीपासून ताटकळत असलेल्या लोकांप्रती सहानुभूती व्यक्त केली. तिकिटांचा काळा बाजार झाला असून, त्याची चौकशी होण्याची गरज त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. शनिवारीही स्टेडियमबाहेर स्फोटक स्थिती होती. काही अवघीच तिकिटे आणि त्यासाठी अपेक्षेबाहेर मागणी, असे चित्र होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही असंतोष निर्माण होऊन धक्काबुक्की होण्याचे प्रकारही घडले होते.
१७ डिसेंबरला फातोर्ड्याच्या नेहरूस्टेडियमवर एफसी गोवा आणि अॅटलेटिको कोलकाता यांच्यात सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्याची तिकिटे मिळावीत यासाठी शनिवारी तसेच रविवारीही लोकांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळी सव्वादहाच्या सुमारास तिकिटे संपल्याचे जाहीर केल्यानंतर लोकांच्या संतापाचा पारा चढला. प्रक्षुब्ध जमावाने राग शेडपत्र्यांवर काढताना, त्यांची मोडतोड केली व जाहिरात फलकही पेटवून दिले. घटनास्थळी ज्यादा पोलीस कुमक पाठवून देण्यात आली. उपअधीक्षक मोहन नाईक, पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी घटनास्थळी जाऊन संतप्त जमावाला शांत केल्याने बऱ्याच वेळाने वातावरण निवळले.
आॅनलाईन तिकिटे अर्ध्या तासात संपली
फातोर्ड्यात रंगणाऱ्या सेमीफायनलच्या तिकिटांची विक्री आॅनलाईनही उपलब्ध होती. मात्र, अर्ध्या तासात ही तिकिटे संपली. त्यामुळे यात काहीतरी काळेबेरे असावे, असा संशयही व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी आॅनलाईन तिकिटे विकण्यास सुरुवात झाली होती. मात्र, अर्ध्या तासात तिकिटे संपल्याचे दिसू लागल्याने सकाळपासून इंटरनेटवर बसलेल्या फुटबॉलप्रेमींचीही घोर निराशा झाली. (प्रतिनिधी)