गोव्यात गडगडाटासह मुसळधार; जोरदार वारे आणि पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 21:45 IST2019-10-16T21:44:59+5:302019-10-16T21:45:10+5:30
गोव्यात आज भर दुपारी काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ दाटले आणि मोठ्या गडगडाटासह सुमारे एक ते दीड तास मुसळधार पावसाने राज्याच्या विविध भागांना झोडपून काढले.

गोव्यात गडगडाटासह मुसळधार; जोरदार वारे आणि पडझड
पणजी : गोव्यात आज भर दुपारी काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ दाटले आणि मोठ्या गडगडाटासह सुमारे एक ते दीड तास मुसळधार पावसाने राज्याच्या विविध भागांना झोडपून काढले. एक ते दीड तासाच्या पवसाने सर्वत्र दाणादाण उडविली. जोरदार वा-यामुळे अनेक ठिकाणी पडझडही झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हवामान खात्याने नैऋत्य मान्सून देशभरातून माघारी परतल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. ईशान्येचा पाऊस तामीळनाडूत सक्रीय आहे, त्याचे परिणाम गोव्यात दिसून येत असून पुढील तीन दिवस गडगडाटासह जोरदार वारा-पाऊस होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नैऋत्य मान्सून माघारी परतल्याचे जाहीर
हवामान वेधशाळेचे संचालक के. व्ही. पडगीलवार म्हणाले की, ‘गोव्यासह देशभरातून मान्सून माघारी परतल्याची घोषणा आज दुपारी अधिकृतपणे करण्यात आलेली आहे. नैऋत्य मान्सूनची माघार राजस्थानहून सुरु होते. मंगळवारी रत्नागिरीपर्यंत मान्सूनने माघार घेतली होती. तामीळनाडूमध्ये सध्या जी मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे ती ईशान्य पावसाची आहे. त्याचे परिणाम गोव्यात दिसून येत आहेत. पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण, गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे.’
बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास राजधानी शहरासह आजुबाजुचा परिसर तसेच अनेक गावांमध्येही काळे ढग आभाळात दाटून आले. गडगडाट आणि विजा चमकून जोरदार वाºयासह मोठ्या थेंबांचा जोरदार पाऊस सुरु झाला. यामुळे लोकांची तारांबळ उडाली. गेले दोन तीन दिवस हवेतील उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला होता. बुधवारी सकाळपासूनच अंगाची लाही लाही होत होती.
....................
ताळगाव येथे घरावर झाड कोसळले; अनेक ठिकाणी पडझड
वरील दोन तासांच्या कालावधीत अग्निशामक दलास पणजी व आजुबाजुच्या परिसरातून पडझडीचे सात ते आठ कॉल्स आले. शंकरवाडी, ताळगांव येथे परेश नाईक यांच्या घरावर झाड कोसळल्याने त्यांची सुमारे अडीच लाख रुपयांची हानी झाली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी मात्र टाळली. मळा येथे रस्त्यावर झाड कोसळले. जुन्या सचिवालयाजवळ, टोंक येथे रस्त्यावर तसेच आल्तिनो येथेही झाडे उन्मळून पडली. अग्निशामक दलाचे जवान सायंकाळी उशिरापर्यंत हे अडथळे दूर करण्याच्या कामात व्यस्त होते.