गोव्यात आयपीएल बेटिंग प्रकरणी आणखी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 13:46 IST2020-10-02T13:46:09+5:302020-10-02T13:46:25+5:30
IPL Betting in Goa: लॅपटॉप, एलईडी स्क्रीन, मोबाईल फोन जप्त; क्राइम ब्रांचची मोरजीत कारवाई

गोव्यात आयपीएल बेटिंग प्रकरणी आणखी तिघांना अटक
पणजी : गोव्यातआयपीएल बेटिंग प्रकरणी क्राइम ब्रांच पोलिसांनी मोरजी येथे आणखी तिघांना अटक करून त्यांच्याकडून एक लॅपटॉप, एलईडी स्क्रीन, मोबाईल फोन व रोख १९,२०० रुपये जप्त केले.
अटकेतील तिघेही हैदराबाद येथील असून संदीप पटेल, कृष्णकांत व भोजा भोपाल यादव अशी या तिघांची नावे आहेत. मोरजी येथे 'अदारा प्राईम' या हॉटेलवर धाड घालून पोलिसांनी ही कारवाई केली.
आयपीएल बुकींनी गोव्यात बस्तान मांडले असून बुधवारी कांदोळी येथील एका व्हिल्लावर छापा मारून आयपीएल बेटिंग घेणाऱ्या रॅकेटचा कळंगुट पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणी राजस्थान तसेच भोपाळमधील मिळून पाच जणांना अटक झाली होती. त्या पाठोपाठ क्राइम ब्रांचने मोरजी येथे कारवाई केली आहे.
आयपीएल क्रिकेट सामने सुरू होतात तेव्हा गोव्यात मोठ्या प्रमाणात बेटिंग होते. त्यामुळे बेटिंग घेणारे आणखीही बुकी गोव्यात काही ठिकाणी असावेत, असा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने तपास चालू आहे.
मोजीत पकडलेले तिघेजण बेटिंग घेणारे सराईत टोळीतील असून गेली ४ वर्षे बेटिंग घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरवर्षी ते आपली ठिकाणे बदलतात. क्रिकेट मोसम सुरू झाला की ते अशा प्रकारे बेटिंग घेतात आणि मोसम संपल्यावर बेटिंग विजेत्यांचे पैसे चुकते करतात.
क्राइम ब्रांचचे निरीक्षक मंगेश वळवईकर, निरीक्षक राहुल परब, निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
१९७६ च्या गोवा, दमण व दिव सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि कलम ४ खाली वरील तिघांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. उपनिरीक्षक नीतीन हळर्णकर या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत.