सिलिंडरच्या भडक्यात तिघे जखमी

By Admin | Updated: January 30, 2015 01:26 IST2015-01-30T01:22:45+5:302015-01-30T01:26:18+5:30

ओरल-असोळणा येथील दुर्घटना : आग विझविण्यासाठी गेले असता इजा

Three cylinders were injured in the blaze | सिलिंडरच्या भडक्यात तिघे जखमी

सिलिंडरच्या भडक्यात तिघे जखमी

मडगाव : ओरल-असोळणा येथे एका घराच्या व्हरांड्याला लागलेली आग विझविण्यासाठी गेले असता घरगुती गॅसचा स्फोट झाल्याने तिघेजण जखमी झाले. या आगीत दोन दुचाकी जळून खाक झाल्या असून पाच लाखांची हानी झाली आहे. मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणताना दहा लाखांची मालमत्ता वाचवली.
गुरुवारी सकाळी ११.३0 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत जुझे कार्दिन्हो (वय ५३), जेरी फर्नांडिस, फ्रान्सिस रॉड्रिगीस हे तिघे जखमी झाले. जुझे याला तातडीने मडगावच्या हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी त्याला गोमेकॉत दाखल केले आहे, तर या घटनेत जेरी व फ्रान्सिस हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अग्निशामक दलाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, ओरल येथे सुभाष केरकर यांच्या घरात ही घटना घडली. सुभाष केरकर व महादेव केरकर या दोघा भावांचे घर एकमेकांना जोडून आहे. आगीची घटना घडली तेव्हा केरकर यांचे घर बंद होते.
प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार, केरकर कुटुंबीय नेहमी घरासमोर असलेल्या व्हरांड्यात दिवा पेटवून ठेवत असत. हा दिवा खाली पडल्याने आग लागली व ती विझविण्यासाठी जुझे व जेरी हे दोघेही शेजारी गेले असता, व्हरांड्यातच ठेवलेल्या घरगुती गॅस सिलिंडरने पेट घेऊन त्याचा भडका उडाल्याने दोघेही जखमी झाले. या भागातील काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीने पेट घेतल्याने ती आग विझविण्यासाठी गेले असता, गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनीही तेथे धाव घेतली. आगीची घटना म्हणून या प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली आहे.
जुझे परदेशात जहाजावर कामाला असून दोन दिवसांनंतर तो कामावर जाणार होता. (प्रतिनिधी)

Web Title: Three cylinders were injured in the blaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.