लोबोंसह तिघांवर आरोपपत्र
By Admin | Updated: March 12, 2016 02:38 IST2016-03-12T02:36:39+5:302016-03-12T02:38:04+5:30
पणजी : बागा समुद्रकिनाऱ्यावर हॉटेल बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कळंगुटचे आमदार मायकल लोबो

लोबोंसह तिघांवर आरोपपत्र
पणजी : बागा समुद्रकिनाऱ्यावर हॉटेल बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कळंगुटचे आमदार मायकल लोबो व अन्य दोघांवर सीआयडी गुन्हा शाखेच्या पोलिसांनी म्हापसा येथील प्रथमश्रेणी न्यायालयात शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. लोबो आणि हॉटेल प्रकल्पातील दोघा भागीदारांना आरोपी केले आहे. गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाचा (जीसीझेडएमए) बोगस ना हरकत दाखला सादर केला, तसेच योग्य ते परवाने न घेताच बांधकाम केल्याचा या सर्वांवर आरोप आहे.
लोबो व त्यांच्या भागीदारांवर भादंसंच्या कलम ४६८ (खोटारडेपणा), ४७१ (बोगस दाखला खरा म्हणून वापरणे), ४२0 (फसवणूक) व कलम २0१ (पुरावे गायब करणे) या चार कलमांखाली हे आरोपपत्र सादर केले आहे. २0१0 मध्ये गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाचे तत्कालीन सदस्य सचिव मायकल डिसोझा यांनी या प्रकरणी लोबो तसेच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर बोगस ना हरकत दाखल्याबाबत तक्रार केली होती.
हॉटेल बांधकामासाठी लोबो यांना सनद दिलीच नसल्याचे उत्तर गोवा दंडाधिकारी कार्यालयातून स्पष्ट केले असून, तसे पत्र गुन्हा शाखेला पाठविले आहे. लोबो यांच्यावर फसवणुकीचा आणि कागदपत्रात फेरफार करण्याचा गुन्हा नोंदविल्यामुळे आणि पोलिसांकडे ठोस पुरावेही असल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. (प्रतिनिधी)