हे सरकार गरीब, होतकरूंचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; घरदुरुस्तीसाठी आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2025 11:59 IST2025-02-09T11:59:11+5:302025-02-09T11:59:53+5:30
घर दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे आर्थिक मदत करण्यात आली.

हे सरकार गरीब, होतकरूंचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; घरदुरुस्तीसाठी आर्थिक मदत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : समाजातील गरीब व दुर्बल घटकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी फायदेशीर ठरत आहे. आतापर्यंत अनेकांनी या निधीचा लाभ घेत आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी मदत मिळवली. सरकार गरीब आणि होतकरू लोकांचेच असून, लोकांनी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री जॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गोकुळवाडी-साखळी येथील एका महिलेच्या घराची भिंत आणि काही भाग कोसळल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढावले होते. त्यांना घर दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे आर्थिक मदत करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा मदतीचा धनादेश शालन नाईक यांच्याकडे सुपूर्द केला.
आठ दिवसांत मंजुरी
या आर्थिक साहाय्याचा प्रस्ताव सरकारदरबारी सादर करून आठ ते दहा दिवसांमध्ये प्रभावी पाठपुरावा करून मंजुरी मिळविण्यात आली. या आर्थिक साहाय्याचा धनादेश मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते शालन नाईक यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी त्यांचा मुलगा रितेश नाईक, माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर उपस्थित होते.
नगरसेवकांचा पाठिंबा
प्रभाग क्र. ६ मधील गोकुळवाडी येथील शालन नाईक यांच्या घराची भिंत व अर्धा भाग कोसळल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले होते. या घटनेची माहिती स्थानिक नगरसेवक विश्रांती पार्सेकर आणि माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली. नंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला.