तिसऱ्या आघाडीचा राज्यव्यापी प्रभाव अशक्य
By Admin | Updated: November 29, 2015 01:58 IST2015-11-29T01:57:49+5:302015-11-29T01:58:02+5:30
पणजी : राज्यातील तीन अपक्ष आमदार येत्या जानेवारी महिन्यात तिसरी आघाडी स्थापन करू पाहत आहेत. मात्र, सत्ताधारी

तिसऱ्या आघाडीचा राज्यव्यापी प्रभाव अशक्य
पणजी : राज्यातील तीन अपक्ष आमदार येत्या जानेवारी महिन्यात तिसरी आघाडी स्थापन करू पाहत आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपने अजून हा विषय गंभीरपणे घेतलेला नाही. भाजपचे आमदार विष्णू वाघ यांना तर तिसरी आघाडी राज्यव्यापी प्रभाव निर्माण करू शकणार नाही, असे वाटते.
तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या अपक्ष आमदारांच्या निर्णयाकडे भाजप किंवा आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, असे वाघ यांना शनिवारी विचारले असता ते म्हणाले की, तिसरी आघाडी राज्यव्यापी प्रभाव टाकू शकेल असे सध्या तरी आपल्याला वाटत नाही. तीन-चार अपक्ष आमदार एकत्र आले म्हणून तिसरा मोठा राजकीय पक्ष तयार होतो किंवा तिसरा मोठा पर्याय लोकांना प्राप्त होतो, असे होत नाही. दर निवडणुकीवेळी गोव्यात तीन-चार अपक्ष आमदार निवडून येतातच. एका बाजूने राष्ट्रीय पक्ष नको असे म्हणायचे व दुसऱ्या बाजूने स्वत:चा प्रादेशिक पक्ष कोणता तेही सांगायचे नाही, अशी अधांतरी स्थिती तिसऱ्या आघाडीबाबत आहे.
वाघ म्हणाले की, तिसरा राजकीय पर्याय लोकांना देण्याची भाषा करणाऱ्या अपक्ष आमदारांकडे ठाम अशी वैचारिक भूमिका मला दिसत नाही. प्रादेशिक पक्षच बरा, राष्ट्रीय पक्ष योग्य नव्हे, अशी भूमिका आता काही अपक्ष आमदार करतात; पण गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी दक्षिण गोव्यात काँग्रेसचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड यांना पाठिंबा दिला होता. रेजिनाल्ड हे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार होते. आपणच आपले हायकमांड व्हावे, असे म्हणायचे व राष्ट्रीय पक्षांना दोष देतानाच मडगावमध्ये दिगंबर कामत या काँग्रेसच्या उमेदवाराशी राजकीय हातमिळवणी करायची, हा मोठा विरोधाभास आहे. म्हणूनच मी म्हणतो की नियोजित तिसऱ्या आघाडीला जन्म देऊ पाहणाऱ्या अपक्ष आमदारांकडे स्पष्ट अशी भूमिका नाही. स्पष्ट अशी वैचारिक मांडणी नाही. आम्ही सगळे याच दृष्टिकोनातून तिसऱ्या आघाडीविषयीच्या घोषणेकडे पाहतो. (प्रतिनिधी)