आपल्याविरुद्ध थर्ड डिग्री वापरण्याचा डाव - कामत
By Admin | Updated: June 6, 2017 05:42 IST2017-06-06T05:42:15+5:302017-06-06T05:42:15+5:30
माझी कोठडी हवी असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पणजी सत्र न्यायालयात सोमवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.

आपल्याविरुद्ध थर्ड डिग्री वापरण्याचा डाव - कामत
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : थर्ड डिग्रीचे तंत्र वापरून आपल्याकडून खोटे वदवून घेण्याचा एसआयटीचा मनसुबा आहे आणि त्यासाठीच त्यांना माझी कोठडी हवी असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पणजी सत्र न्यायालयात सोमवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. खाण घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या मूळ अर्जाला कामत यांनी जोड प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रकरणात नऊ जून रोजी सुनावणी होणार आहे.
संशयितांवर थर्ड डिग्री प्रयोग करण्यासाठी कायद्याने बंदी असली तरी कामत यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जात एसआयटीकडून आपल्यावर थर्ड डिग्रीचा प्रयोग केला जाईल, अशी भीती व्यक्त केली आहे. आपलाच जबाब आपल्याविरुद्ध वापरण्याचे हे कारस्थान असून आपले राजकीय अस्तित्वच संपुष्टात आणण्याचाही डाव आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
एसआयटीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे इतर कागदपत्रे आहेत असे म्हटले आहे. पुरावे असल्यास आपली कोठडीतील चौकशी कशाला हवी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.