साखळी भागात चोरट्यांचा धुडगूस
By Admin | Updated: August 8, 2014 02:26 IST2014-08-08T02:20:41+5:302014-08-08T02:26:12+5:30
डिचोली : साखळी भागात चोरट्यांच्या टोळीने डिचोली पोलिसांच्या नाकावर टिच्चून दत्तवाडी-साखळी येथील तीन दुकाने व न्हावेली येथील लक्ष्मीनारायण

साखळी भागात चोरट्यांचा धुडगूस
डिचोली : साखळी भागात चोरट्यांच्या टोळीने डिचोली पोलिसांच्या नाकावर टिच्चून दत्तवाडी-साखळी येथील तीन दुकाने व न्हावेली येथील लक्ष्मीनारायण देवस्थानमधून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. यामुळे डिचोली पोलिसांसमोर तपासासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे.
डिचोली पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, न्हावेली येथे मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराचे डाव्या बाजूचे दार तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व गर्भगृहातील चांदीची प्रभावळ, एक फुल व मुखवटा आणि फंडपेटीतील सुमारे पाच हजार रोख मिळून सुमारे ३ लाख ५५ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी भरोणीवाडा-न्हावेली येथील सच्चिदानंद काशिनाथ गावस यांनी तक्रार केली आहे. चोरट्यांनी मंदिरातील फंडपेटी मंदिरासमोर टाकली होती.
दत्तवाडी-साखळी येथे भर लोकवस्तीत एका रहिवासी इमारतीत चोरट्यांनी तीन दुकानांना आपले लक्ष्य बनविले. या इमारतीत असलेल्या रोहन एंटरप्रायझेस या इलेक्ट्रॉनिक दुकान, गणेश जनरल स्टोअर व फोटोग्राफी या दुकानांमध्ये चोरी केली.
चोरट्यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक चोरी केल्याचे चोरीची पद्धत पाहता निदर्शनास आले. गणेश जनरल स्टोअर हे मध्यभागी असून त्याच्या डाव्या बाजूला इलेक्ट्रॉनिक, तर उजव्या बाजूला फोटोग्राफी दुकान आहे. चोरट्यांनी गणेश जनरल स्टोअरच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाच्या खिडकीचे रॉड तोडून आत प्रवेश केला. जनरल स्टोअरमध्ये असलेले दार फोडून उजव्या बाजूला असलेल्या फोटोग्राफी दुकानात प्रवेश करत तेथील सुमारे दोन हजार रोख ताब्यात घेतले. नंतर त्यांनी गणेश जनरल स्टोअरच्या पहिल्या मजल्यावर जात दुकानाच्या दर्शनी वरील भागात असलेल्या खिडकीचे ग्रील्स तोडले व बाहेर येत बाजूला असलेल्या रोहन एंटरप्रायझेस या दुकानाचे वरील ग्रील्स तोडून आत प्रवेश केला. या दुकानातील एलईडी टीव्ही व सुमारे सहा हजार रोख रुपये लंपास केले. नेमके किती एलईडी टीव्ही चोरीस गेले त्याचा अंदाज न मिळाल्याने चोरीच्या रकमेचा आकडा समजू शकला नाही.
डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी निरीक्षक रूपेंद्र शेटगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल माजीक अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)