प्रवेश कर जैसे थे!
By Admin | Updated: January 2, 2015 01:11 IST2015-01-02T01:03:06+5:302015-01-02T01:11:33+5:30
पेट्रोल दरवाढीमुळे निर्णय : सिंधुदुर्ग, कारवारमधील वाहनचालकांना दिलासा

प्रवेश कर जैसे थे!
पणजी : गोव्याच्या शेजारील जिल्ह्यांतील वाहनांनाही प्रवेश तथा साधनसुविधा कर लागू करावा आणि त्यासाठी पास पद्धत लागू करावी, असा प्रस्ताव यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने आणला होता. आता पेट्रोल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तसा प्रस्ताव अमलात आणण्याचा विचार बांधकाम खात्याने सोडून दिला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द झाल्यात जमा आहे.
परप्रांतातील वाहनांना गोव्यात येण्यासाठी सीमेवर शुल्क भरावे लागते. यामुळे वार्षिक सुमारे ६0 कोटी रुपयांचा महसूल सरकारला प्राप्त होतो. फक्त जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या वाहनांना हे शुल्क भरावे लागत नाही. तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कारवारमधून जी वाहने येतात, त्या वाहनांनाही प्रवेश करातून मोकळीक देण्यात आली आहे. मात्र, ही मोकळीक रद्द करावी व सर्वच वाहनांना प्रवेश तथा साधनसुविधा कर लागू करावा, असा प्रस्ताव बांधकाम खात्याने आणला होता. वारंवार जी वाहने गोव्यात येतात, त्यांना पास पद्धत लागू करावी, असेही ठरले होते. तथापि, अशा प्रकारचा प्रस्ताव अमलात आणणे सद्यस्थितीत योग्य होणार नाही, याची कल्पना बांधकाम खात्याला आली आहे. आता प्रवेश कर पद्धत जशी आहे, तशीच ठेवावी व त्या पद्धतीची व्याप्ती आणखी वाढवू नये, असे तत्त्वत: ठरले
आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग
तसेच कर्नाटकमधील कारवार या जिल्ह्यांतील वाहनांना प्रवेश शुल्क द्यावे लागणार नाही.
गोमंतकीय वाहनांनाही प्रवेश शुल्क लागू केले जाईल, अशी चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती. तथापि, तो विचारही सरकारने लगेच बदलला. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोलच्या दरात थोडी घट झाली तरी, गोव्यात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ लागू झाली आहे.
(खास प्रतिनिधी)