तडफडणाऱ्या युवकाला सोडून ते गेले पळून...
By Admin | Updated: December 11, 2015 00:20 IST2015-12-11T00:20:46+5:302015-12-11T00:20:58+5:30
फोंडा : मध्यरात्री दारूच्या नशेने झिंगलेले ते तिघे आपल्या आलिशान कारला भरधाव वेगाने पळवत बाणस्तारी पुलाजवळ

तडफडणाऱ्या युवकाला सोडून ते गेले पळून...
फोंडा : मध्यरात्री दारूच्या नशेने झिंगलेले ते तिघे आपल्या आलिशान कारला भरधाव वेगाने पळवत बाणस्तारी पुलाजवळ पोहोचले खरे; पण नशेचा अंमल इतका गहिरा होता की, समोरून येणाऱ्या मोटरसायकलस्वाराला त्यांनी पाहिले नाही! ...आणि अघटित घडले. कारच्या धडकेने तो फेकला गेला. कारमधील युवक इतके भावनाहीन की, गंभीर जखमी झालेल्या त्या युवकाला घटनास्थळीच तडफडत ठेवून तिथून पोबारा केला. कदाचित नशिबाने साथ दिली असती, तर हा गुन्हा त्यांना पचलाही असता. मात्र, कारचा टायर फुटल्याने ते जास्त अंतर पार करू शकले नाहीत.
बुधवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. प्रवीण भानुदास मडकईकर (२४, रा. आशेवाडा-बेतोडा) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रवीण आपल्या मोटरसायकलवरून (क्र. जीए 0५ ई 0२८२) फोंड्याहून पणजीच्या दिशेने जात होता. बाणस्तारी पुलावर पोहोचला असता, एका भरधाव कारने (क्र. जीए 0९ ए २२३६) त्याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात प्रवीण रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. तो रस्त्यावर तडफडत असताना कारचालकासह अन्य दोघांनी त्याला त्याच अवस्थेत सोडून कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचा टायर फुटल्याने ते कार घेऊन जास्त अंतर पार करू शकले नाहीत. फोंडा पोलिसांनी कार ताब्यात घेऊन अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
अपघातास कारणीभूत ठरलेले युवक कोडली-तिस्क येथील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक पाडलोस्कर तपास करत
आहेत. (प्रतिनिधी)