या ‘दोतोरां’त रुग्णांना दिसतो आणि भेटतो ‘देव’ं!
By Admin | Updated: July 25, 2014 01:50 IST2014-07-25T01:49:32+5:302014-07-25T01:50:52+5:30
पणजी : ‘नायक दोतोर केन्ना येतलो?’ गोमेकॉत नव्यानेच स्थापन झालेल्या हृदयविकाराच्या सुपरस्पेशालिटी विभागात येऊन एक रुग्ण विचारत होता.

या ‘दोतोरां’त रुग्णांना दिसतो आणि भेटतो ‘देव’ं!
पणजी : ‘नायक दोतोर केन्ना येतलो?’ गोमेकॉत नव्यानेच स्थापन झालेल्या हृदयविकाराच्या सुपरस्पेशालिटी विभागात येऊन एक रुग्ण विचारत होता. नायक डॉक्टर तूर्तास परगावी असून काही दिवसांतच ते परतणार असल्याचे उत्तर त्याला दिले गेले. दरम्यानच्या काळात त्याने इतर चाचण्या करून घ्याव्यात, असेही सांगितले गेले. मात्र ‘ना, नायक दोतोर येतकूच येतां हांव!’ असे प्रत्युत्तर देत तो रुग्ण तेथून निघून गेला.
या नायक दोतोराची प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. नायक म्हणजे डॉ. गुरुप्रसाद दत्ता नायक. अमेरिकेत चाललेल्या अफाट प्रॅक्टीसकडे दुर्लक्ष करून आपली सेवा गोमेकॉला देणारा हा निष्णात हृदयरोगतज्ज्ञ अनेकांच्या कृतज्ञतेचा आणि कौतुकाचा विषय ठरतो आहे. असे असले तरी त्यांच्या घरच्यांना मात्र यात विशेष असे काहीच वाटत नाही. याचे कारण म्हणजे लोकाभिमुख वैद्यकसेवा हा शिवोलीच्या नायक घराण्यातील तीन पिढ्यांचा वारसा राहिलेला आहे. आजोबा रामनाथ पंढरीनाथ नायक यांनी दिलेला हा वारसा आता त्यांचा नातू गुरुप्रसाद तितक्याच समर्थपणे पुढे नेतो आहे.
रामनाथ नायक यांनी १९२५ पासून डॉक्टरच्या प्रॅक्टीसला प्रारंभ केला. १९२७ साली त्यांना आवश्यक परवाना मिळाला. त्या काळात हिंदू समाजाचे व्यापारउदिमात प्राबल्य होते. साहजिकच वैद्यक शिक्षणासाठी गेलेल्या रामनाथ नायकांची हेटाळणी इतर हिंदू तसेच पोर्तुगीज शिक्षक आणि त्यांचे गावठी हस्तक ‘पोसरो ना रे तुका?’ (पोसरो म्हणजे दुकान) अशा शब्दांत करायचे. अर्थात, या हेटाळणीवर मात करत रामनाथ नायक यांनी जिद्दीने पदवी मिळवली आणि प्रॅक्टीस सुरू केली. वाहनांच्या दुष्काळाचे ते दिवस होते, नायक यांना दुचाकी वा चारचाकी चालवता येत नव्हती. तसे रस्तेही नव्हते. मात्र, त्यांचा रुग्णपरिवार बार्देसमधील हणजूण, कायसूव, आसगाव अशा भागांबरोबरच नदीपल्याड असलेल्या मोरजी, मांद्रे, हरमल, कोरगावपासून पार तेरेखोलपर्यंत पसरला होता. नदी ओलांडून ते एक बैलगाडी करायचे आणि तिच्यात गवत टाकून त्यावर कांबळ पांघरून या भागात फिरायचे. मांद्रेतील एकेकाळची सुप्रसिद्ध चढण आली की बैलगाडी सोडायची आणि पायी प्रवास सुरू व्हायचा. त्या काळातले निष्णात प्रसुती विशारद म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांना अगदी पणजीतल्या प्रतिष्ठितांच्या घराण्यातूनही बोलावणे यायचे. डॉक्टरांची फी पैशांनी
देण्याची क्षमता त्या वेळी अवघ्याच रुग्णांच्या ठायी होती; पण नायक यांचे पैशासाठी कधीच अडले नाही.
(पान २ वर)