मध्यरात्री खनिज वाहतूक होणार नाही; एजी देविदास पांगम यांची हायकोर्टात हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2025 10:08 IST2025-01-14T10:06:36+5:302025-01-14T10:08:19+5:30
पिळगाव भागात रात्रीच्या वेळी होणाऱ्या खनिज वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

मध्यरात्री खनिज वाहतूक होणार नाही; एजी देविदास पांगम यांची हायकोर्टात हमी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पिळगाव भागात रात्रीच्या वेळी खनिज वाहतूक होणार नाही. खनिज वाहतुकीसाठीच्या मार्गदर्शनतत्त्वांनुसार सायंकाळी ५.४५ वाजल्यानंतर खनिज सार वाहतुकीवर बंदी असून त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी हमी सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठात सोमवारी दिली.
पिळगाव भागात रात्रीच्या वेळी होणाऱ्या खनिज वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी न्यायालयात वाहतुकीबद्दल हमी दिली. त्याचप्रमाणे खनिज वाहतुकीसाठी ट्रक दुसऱ्या मार्गाचा वापर करीत असल्याविरोधात दाखल केल्याच्या याचिकेवर सोमवार, दि. २० रोजी सुनावणी होईल.
अॅड. अजय प्रभूगावकर म्हणाले, पिळगाव भागात वेदांता कंपनीकडून खनिज वाहतूक केली जात आहे. मार्गदर्शकतत्त्वानुसार खनिज वाहतूक संध्याकाळी ५.४५ पर्यंत केली जाऊ शकते. मात्र कंपनीकडून मध्यरात्री सुद्धाही वाहतूक केली जाते. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही वाहतूक सुरू ठेवली जात असल्याने तिथे धूळ प्रदूषण, शेतीच्या नुकसानीसह अनेक गोष्टींना पिळगावसीयांना सामोरे जावे लागत आहे. याविरोधात न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
ग्रामस्थ म्हणतात...
खाण व्यवसायावर अनेकजण प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. त्यामुळे खाण व्यवसाय सुरु राहावा, अशीच आमची इच्छा आहे. परंतु, नियमांचे उल्लंघन करून वाहतूक केल्यास ती खपवून घेतली जाणार नाही. शेतकरी तसेच स्थानिकांना सोबत घेऊन समतोल साधून ही खनिज वाहतूक व्हावी. मात्र आता स्थानिकांना खनिज वाहतुकीमुळे धूळ प्रदूषणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असे मत ग्रामस्थांनी मांडले.
आंदोलनाची दखल...
रात्रभर सुरू असणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे ग्रामस्थांनी एकत्र येत मोठे आंदोलन उभे केले. त्या आंदोलनाची दखल घेत आता वाहतुकीच्या वेळेत बदल करण्यात येत आहे.
परवानगी एका रस्त्याची अन् वाहतूक दुसरीकडून
खनिज वाहतुकीसाठी परवानगी देताना ती कुठल्या मार्गावरून वाहतूक केली जाईल हे नमूद करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात कंपनी नमूद केलेल्या मार्गाचा वापर ने करता वेगळ्याच मार्गावरून खनिज वाहतूक करते. परवानगीमध्ये नमूद केलेल्या मार्गावर अडथळे असल्याने त्याचा वापर होऊ शकत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यानुसार न्यायालयाने त्यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितल्याचे अॅड. प्रभूगावकर यांनी सांगितले.
...तर अवमान याचिका दाखल करणार
पिळगाव परिसरातून आता रात्रीची खनिज वाहतूक होणार नाही. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल, अशी हमी न्यायालयात दिली आहे. त्याची अंमलबजावणीही काटेकोरपणे व्हावी. परंतु जर तसे झाले नाही तर यावर अवमान याचिका दाखल केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.