भागवतांशी माध्यमप्रश्नी चर्चा नाही
By Admin | Updated: December 7, 2015 01:39 IST2015-12-07T01:38:50+5:302015-12-07T01:39:16+5:30
पणजी : राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाविषयी गोव्यातील संघ नेते करत असलेल्या आंदोलनाविषयी राष्ट्रीय

भागवतांशी माध्यमप्रश्नी चर्चा नाही
पणजी : राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाविषयी गोव्यातील संघ नेते करत असलेल्या आंदोलनाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले. पार्सेकर यांनी रविवारी भागवत यांची भेट घेतली. हेडगेवार हायस्कूल इमारतीच्या लोकार्पणासाठी भागवत गोव्यात आले होते. चहापानावेळी आपली भागवत यांच्याशी भेट झाली; पण राज्याच्या कोणत्याच विषयाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर स्पष्ट केले.
प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या विषयावरून भारतीय भाषा सुरक्षा मंच सध्या आंदोलन करत आहे. मंचाचे नेतृत्व संघाच्या काही पदाधिकाऱ्यांकडे आहे. राज्यातील भाजप सरकारला हे आंदोलन होणे नको आहे. त्यामुळे या विषयावर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावर पार्सेकर म्हणाले की आपल्या सरकारच्या काळात वेगवेगळ्या विषयांसाठी आंदोलने झाली; पण आपण कधी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली नाही. माध्यमप्रश्नीही होत असलेल्या आंदोलनात आपण हस्तक्षेप केलेला नाही.
दरम्यान, राज्यातील १३२ इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान सुरू ठेवण्यासाठीचे विधेयक सध्या चिकित्सा समितीकडे आहे. अधिवेशन ११ जानेवारी रोजी सुरू होत असल्याने तत्पूर्वीच चिकित्सा समितीची बैठक होईल. चिकित्सा समिती चर्चा करून काय तो निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. भागवत यांच्या गोवा भेटीचा माध्यम प्रश्नावर सकारात्मक किंवा नकारात्मकही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)