लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली २०२७ सालची निवडणूक भाजप लढवणार आहे. मात्र यापुढे लवकरच सर्व मंत्र्यांच्या खात्यांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत, अशी माहिती मिळाली. बहुतेक मंत्र्यांना याची कल्पना आलेली आहे.
दिल्लीहून केंद्रीय भाजपच्या स्तरावरून गोव्यातील भाजप नेत्यांना गेल्या दोन दिवसांत काही संकेत देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होणार नाहीत. मात्र बाबूश मोन्सेरात, आलेक्स सिक्वेरा, नीळकंठ हळर्णकर, माविन गुदिन्हो, रोहन खंवटे, सुभाष फळदेसाई आदी काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होणार आहेत, अशी चर्चा भाजपच्या आतील गोटात पसरली आहे. मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे टीसीपी खाते कायम राहील, पण अन्य एखादे खाते बदलून दिले जाऊ शकते. रवी नाईक, सुभाष शिरोडकर यांचीही खाती बदलणार आहेत, अशी माहिती मिळाली. कृषीसारखे महत्त्वाचे खाते किंवा पर्यावरणासारखे महत्त्वाचे खाते रवी नाईक व आलेक्स सिक्वेरा यांच्याकडून काढून घेऊन त्यांना दुसरे खाते दिले जाऊ शकते. मंत्री मोन्सेरात यांच्याकडील महसूल खाते बदलले जाऊ शकते. दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल.
दरम्यान, गोविंद गावडे यांचा विषय हाताळतानाच भाजप श्रेष्ठींनी मंत्रिमंडळाच्या पूर्ण फेररचनेचा विचार चालविला असल्यानेच निर्णयासाठी विलंब झालेला आहे.
बी. एल. संतोष गोव्यात; दामू नाईक भेटले
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष काल सायंकाळी उशिरा गोव्यात दाखल झाले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. संघटनात्मक बाबींवर ही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी मंत्रिमंडळ फेरचनेच्या प्रश्नावरही दोघांमध्ये चर्चा विनिमय झाल्याचा अंदाज आहे. आज, शुक्रवारी सकाळी संतोष हे कर्नाटकला निघतील.