लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : मगो पक्ष हा बहुजन समाजाचा पक्ष आहे. मगो पक्षाने राज्यात सत्ता संपादित करून राज्याचा चौफेर विकास केला. त्यानंतर या पक्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या, दुफळी निर्माण झाल्या. त्यावर मात करीत ढवळीकर बंधूंनी हा पक्ष सावरला, ते कुणालाही नाकारता येणार नाही. जर मगो पक्षाच्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी आणि ढवळीकर बंधूंनी आमच्यावर अध्यक्षपदाची धुरा दिली, तर ती आम्ही स्वीकारण्यास तयार असल्याचे मत मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केले.
आमदार जीत आरोलकर म्हणाले, मगो पक्ष हा बहुजन समाजाचा पक्ष, इथल्या मातीतला पक्ष आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाऊसाहेब बांदोडकर यांचे कार्य अजूनही सुरू आहे. शैक्षणिक आरोग्य सामाजिक क्रीडा क्षेत्रात भाऊसाहेब बांदोडकर यांनी केलेले कार्य कुणीही विसरू शकत नाही. त्यांच्यासारखा मुख्यमंत्री पुन्हा होणे शक्य नाही.
मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर चलबिचल
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांद्रे भाजप मंडळांच्या कार्यकर्त्याच्या बैठकीला मार्गदर्शन करताना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असे म्हटले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी प्रियोळ मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी मगो पक्षाला जाहीर आव्हान करताना, जर युतीचा धर्म तुम्हाला पाळता येत नसेल, तर युती आताच तोडा, असे म्हटले होते. त्या अनुषंगाने आता अनेक मगोच्या कार्यकर्त्यांनी ढवळीकर बंधूंनी स्वखुशीने मगो पक्षाचे अध्यक्षपद स्वतःकडे न ठेवता ते बहुजन समाजाच्या नेत्याकडे द्यावे किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या स्वाधीन करावे, अशी मागणी केली जात आहे. मंत्री गोविंद गावडे यांनी ढवळीकर बंधूंना आव्हान देताना हिंमत असेल, तर मगोचे अध्यक्षपद आमदार जीत आरोलकर यांना द्यावे, असे म्हटले आहे.
ढवळीकर बंधूंबद्दल मला आदरभावच...
मगो पक्षातून अनेक आमदार निवडून आले. सत्ता मिळताच दुसऱ्या पक्षातही पक्षांतर केले. परंतु ढवळीकर बंधू ज्यावेळी आमदार झाले, त्यानंतर त्यांनी कधीच पक्षांतर केले नाही. दुसऱ्या पक्षात पाठिंबा देऊन सत्तेत गेले. परंतु, पक्षांतराची भाषा त्यांनी कधीच केली नाही. त्यांच्याविषयी आपणास अजूनही आदर आहे. ढवळीकर बंधूंनी मनातून ठरवले आणि कार्यकर्त्यांनी आपल्याकडे मगो पक्षाची अध्यक्षपदाची धुरा देण्यास तयारी दर्शवली तर ती स्वीकारण्यास आपण सज्ज आहे, असे जीत आरोलकर म्हणाले.