चोरीच्या मालाची हेराफेरी भोवली
By Admin | Updated: November 26, 2015 01:33 IST2015-11-26T01:33:31+5:302015-11-26T01:33:45+5:30
फोंडा : बजाज फायनान्सच्या नावे इलेक्ट्रॉनिक दुकानांना गंडा घालणाऱ्यांकडून चोरीचे सामान जप्त करण्यात हयगय

चोरीच्या मालाची हेराफेरी भोवली
फोंडा : बजाज फायनान्सच्या नावे इलेक्ट्रॉनिक दुकानांना गंडा घालणाऱ्यांकडून चोरीचे सामान जप्त करण्यात हयगय करणाऱ्या उपनिरीक्षक राहुल नाईक व या सामानातील दोन वातानुकुलित यंत्रे खरेदी करणाऱ्या मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचा साहाय्यक उपनिरीक्षक तथा वाहनचालकाला अखेर बुधवारी (दि. २५) निलंबित करण्यात आले. पणजीतील पोलीस मुख्यालयातून त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला असून आता त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, अमरदीप शिवानंद राठोड (२९, रा. गड्डेर, तामशिरे-बोरी) आणि मुकेश मधुकर सावंत (३३, रा. शापोरा-बार्देस) हे दोघे बनावट कागदपत्रे सादर करून बजाज फायनान्सच्या नावे इलेक्ट्रॉनिक दुकानांची फसवणूक करत होते. गेल्या २७ आॅक्टोबर रोजी शिवोली येथील रुक्मिणी ट्रेडर्स या आस्थापनाच्या मालकास फसविण्याच्या प्रयत्नात असताना फोंडा पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली होती. मात्र, त्यांच्याकडून पळविण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात पोलिसांना अपयश आले होते.
मागाहून त्या संशयितांनी दुकानांतून पळवलेले साहित्य फोंड्यातील एक व्यावसायिक ललित सोळंकी यांना कमी दरात विकल्याचे स्पष्ट झाले होते. फोंडा पोलिसांनी या संदर्भात ललित सोळंकी यांना अटक केली असता त्यांच्याकडून या प्रकरणात तपास अधिकारी राहुल नाईक तसेच हल्लीच साहाय्यक उपनिरीक्षकपदी बढती मिळालेला मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचा वाहनचालक मोहन हळर्णकर हे दोघेही सहभागी असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने फोंडा पोलिसांनी त्वरित कारवाई करीत ललित सोळंकी, तसेच दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी पळवलेल्या सामानातील काही माल जप्त केला होता. तसेच त्या उपनिरीक्षकाचे खासगी वाहन आणि मोबाईल संचही फोंडा पोलिसांनी जप्त केला होता.
चोरीस गेलेल्या सामानाच्या खरेदी प्रकरणात तपास अधिकारी तसेच अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याने फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक तसेच उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेत वरिष्ठांना अहवाल पाठवला होता. त्यात दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर जाणून बुजून या प्रकरणात सहभागी झाल्याचा ठपका ठेवला होता.
या अहवालाच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश आज संध्याकाळी जारी केला. दरम्यान, हे प्रकरण शेकण्याची शक्यता निर्माण झाल्याने दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी राजकीय दबाव आणून या प्रकरणातून सुटण्याची धडपड चालवली होती. राजकीय दबावापोटी हे प्रकरण दाबले जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच दोषी पोलिसांवर कारवाई न झाल्यास पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होण्याची भीतीही व्यक्त होत होती. मात्र, आज वरिष्ठांकडून दोघांच्याही निलंबनाचा आदेश निघाल्याने फोंड्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
फोंडा पोलिसांनी या प्रकरणी योग्य भूमिका बजावल्याने सध्या निरीक्षक सुदेश नाईक यांचे अभिनंदन होत आहे. आता या दोन्ही निलंबित कर्मचाऱ्यांचे भवितव्य खात्यांतर्गत चौकशीवर अवलंबून आहे. तेथेही निपक्षपातीपणे चौकशी होऊन या दोघांवर योग्य ती कारवाईची
मागणी होत आहे. (प्रतिनिधी)