सत्ताधारी भरकटले; संस्कृती, सनबर्न फेस्टिव्हल अन् राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2024 13:00 IST2024-12-03T13:00:07+5:302024-12-03T13:00:07+5:30

आता नव्या विकृतीच्या खुणा गोव्याच्या संस्कृतीप्रेमी धारगळ गावात सरकार निर्माण करत आहे, म्हणूनच सत्ताधारी ढोंगी, कावेबाज आणि दांभिक वाटू लागलेत.

the rulers went astray culture sunburn festival and goa politics | सत्ताधारी भरकटले; संस्कृती, सनबर्न फेस्टिव्हल अन् राजकारण

सत्ताधारी भरकटले; संस्कृती, सनबर्न फेस्टिव्हल अन् राजकारण

उठता-बसता संस्कृतीच्या अतिगप्पा जो कुणी सांगत असतो, त्याच्याविषयी समाजाला हळूहळू शंका वाटू लागते. संस्कृती संवर्धनाचे डोस पाजणारे दांभिक किंवा ढोंगी तर नाहीत ना, असा संशय येऊ लागतो. गोवा सरकारविषयी पेडण्यातील लोकांना नेमके असेच वाटू लागलेय. आम्हाला पोर्तुगीजकालीन खाणाखुणा गोव्यातून पुसून टाकायच्या आहेत, अशा घोषणा मध्यंतरी सरकारने केल्या होत्या. पोर्तुगीजांनी काही मंदिरे पाडली, म्हणून पोर्तुगीजांच्या खाणाखुणा पुसण्याचा संकल्प सरकारने सोडला होता. त्यावर काही महिने समाजात खूप चर्चा झाली, पण सरकारने एकही खूण पुसली नाही. उलट आता नव्या विकृतीच्या खुणा गोव्याच्या संस्कृतीप्रेमी धारगळ गावात सरकार निर्माण करत आहे, म्हणूनच सत्ताधारी ढोंगी, कावेबाज आणि दांभिक वाटू लागलेत. 

इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हलची संस्कृती पोर्तुगीजांनी गोव्यात आणली नव्हती. ईडीएममध्ये ७२ तास अखंड नृत्य किंवा धांगडधिंगा करण्यासाठी कुणी नुसते पाणी पिऊन येत नसतात. तो स्टॅमिना आणि ती शक्ती येण्यामागील कारण वेगळे असते. गोव्यात पूर्वी काही ईडीएममध्ये ड्रग्ज वगैरे घेऊन काहीजण कसे दगावले, हे पूर्ण देशाला ठाऊक आहे. मध्यंतरी एका ईडीएम कंपनीची थकबाकी वसूल करण्यासाठी सरकारला दोन-तीन वर्षे खटला लढावा लागला होता. गोव्यात ईडीएम आयोजित केला गेला, तरच पर्यटकांची संख्या वाढेल, असे सरकारला वाटते. गोव्याचे भविष्यात थायलंड मात्र करू नका, अशी सूचना आता लोक सत्ताधाऱ्यांना करतील.

पणजी शहराचा मुख्य रस्ता हा कॅसिनो लेन जाहीर केल्यासारखी रात्रीची स्थिती असते. जुन्या सचिवालयासमोरील जागा आणि मार्ग व नदी पूर्णपणे कॅसिनो व्यावसायिकांनी ताब्यात घेतली आहे. ज्या भंपक संस्कृतीप्रेमींनी काही वर्षांपूर्वी मशाल मोर्चा काढला होता, त्यांनीच कॅसिनोंसाठी रेड कार्पेट अंथरले. ती परंपरा आता बऱ्यापैकी सुरू आहे. त्याबाबत विद्यमान सरकारने पूर्वसुरींचा वारसा बऱ्यापैकी चालवलाय, हे मान्य करावे लागेल. शेवटी पूर्वजांचा वारसा चालविणे ही आपली संस्कृती नव्हे काय? संस्कृतीच्या मुशीत आपण घडलोय असे अनेकजण सांगतात. तसे सांगण्याची फॅशन आहे. पण सनबर्न संस्कृतीच्या मुशीत गोवा घडलेला नाही, हे मात्र सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे. सत्तेचा कैफ आणि नशा ही अल्पकाळाचेच आयुष्य घेऊन आलेली असते. लोकांच्या सहनशीलतेचा अंत होतो तेव्हा राजा-महाराजांनाही सिंहासने सोडावी लागतात.

धारगळ हा गाव सनबर्नसाठी नाही. तेथील भूमी देवालयांची असून, जत्रोत्सव, कालोत्सवाने पावन झालेली आहे. उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत ईडीएमचे भूत सरकारने नाचविले असते, तर कुणी दोष दिला नसता. देशातील ज्या घटकांकडे प्रचंड पैसा आहे, त्यांना टुरिझम हबमध्ये खुशाल नाचू दे. त्यांना ७२ तास अखंड पार्टी करू दे. मात्र निर्व्यसनी आणि निसर्गसंपन्न गावांमध्ये ईडीएम नेण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी करू नये. पर्यटन अतिप्रमाणात वाढविण्याचे कंत्राट जर सरकारने घेतलेलेच असेल, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक मिनी ईडीएम आयोजित करावा, अशी सूचना भविष्यात काही आमदार करू लागतील. खाओ, पिओ, मजा करो, असा संदेश युवा मतदारांना देऊ या, असे ठरवून काही आमदार स्वखर्चानेही सनबर्न आयोजित करू शकतील. मध्यंतरी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी जुने गोवेत मिनी सनबर्न तरी व्हायला हवा, अशी महापवित्र इच्छा व्यक्त केली होती. त्यांचा हेतू उदात्त होता. 

जनतेला मोठ्या मनाचे आमदार मिळाले की मग मोठे मोठेच विचार त्या आमदारांकडून व्यक्त केले जातात. अर्थात त्यांची ती मनोकामना पर्यटनमंत्री रोहन खंवटे किंवा मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली नाही. पुढे काही दिवसांत फळदेसाई यांनी आपली भूमिका बदलली, हा वेगळा मुद्दा आहे. मात्र, गोवा सरकारला आपल्या भापल्या पुढील बैठकीत सनबर्नचे मार्केटिंग कसे करावे किंवा गावागावांत मंदिरांच्या परिसरात सनबर्न कसे आयोजित करावेत, याविषयी चर्चा करता येईल. कीर्तन महोत्सव किंवा भजनाचे कार्यक्रम कुठे रंगत असतील, तर ते तूर्त थांबवून सगळीकडे छोटे ईडीएम आयोजित करता येतील. सरकार भविष्यात अशा ईडीएमसाठी सबसिडीदेखील देऊ शकेल. शेवटी हे सगळे विकृतीच्या पालखीत बसून येणारे कथित प्रगतीचे टप्पे आहेत.
 

Web Title: the rulers went astray culture sunburn festival and goa politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.