दाबोळी विमानतळावरील प्रवासी संख्या १५ ते २० टक्क्यांनी घटली
By किशोर कुबल | Updated: February 28, 2024 16:00 IST2024-02-28T15:59:46+5:302024-02-28T16:00:11+5:30
विमानतळ संचालकांची माहिती

दाबोळी विमानतळावरील प्रवासी संख्या १५ ते २० टक्क्यांनी घटली
पणजी : दाबोळी विमानतळावरील प्रवाशांची संख्या १५ ते २० टक्क्यांनी कमी झाली आहे, अशी माहिती विमानतळ संचालक. एस.व्ही.टी. धनंजय राव यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे ते म्हणाले. गेल्या आर्थिक वर्षात दाबोळी विमानतळावर ८४ लाख प्रवासी हाताळण्यात आले. या आर्थिक वर्षात ही संख्या सुमारे ७० लाख एवढी आहे. सुमारे १५ ते २० टक्के प्रवासी घटल्याचे राव म्हणाले.
दरम्यान, कतार एअरवेजने येत्या जूनपासून आपली विमानसेवा मोपाला हलविली आहे. एकेक करून विमान कंपन्या दाबोळीवरून मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित होत असल्याने दाबोळी विमानतळ बंद पडेल, अशी भीती दक्षिण गोव्यातील लोक व्यक्त करीत आहेत आहे.
विमानतळ संचालक राव यांनी मात्र तसे काही होणार नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की, येत्या उन्हाळ्यात 'दाबोळी'ला अतिरिक्त उड्डाणे मिळतील. एक चार्टर ऑपरेटर वगळता बहुतेक चार्टर उड्डाणे दाबोळीवरूनच होतात, असेही ते म्हणाले. मार्चमध्ये इंडिगो एअरलाइन्स हैदराबाद-गोवा-पुणे अशी आणखी विमाने दाबोळीवरून सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.