राज्यपालांनी लिहिली १७ पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2025 11:53 IST2025-01-31T11:52:59+5:302025-01-31T11:53:04+5:30
'लोकमत'चे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते व संपादक सदगुरू पाटील यांनी राजभवनवर राज्यपालांची भेट घेतली.

राज्यपालांनी लिहिली १७ पुस्तके
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील आपल्या तीन-साडेतीन वर्षांच्या वास्तव्यात एकूण १७पुस्तके लिहिली आहेत. गोव्यातील आयलँड्स व अन्य अनेक विषयांवर सातत्याने लेखन करून राज्यपालांनी एवढ्या मोठ्या संख्येने गोव्यात गेल्या दोन-तीन वर्षांत पुस्तके लिहिली. गोव्यात राहून १७ पुस्तके लिहिणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत, असे म्हणता येईल. काल 'लोकमत'चे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते व संपादक सदगुरू पाटील यांनी राजभवनवर राज्यपालांची भेट घेतली.
त्यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी राज्यपाल पिल्लई यांनी आपल्या ग्रंथ संपदेविषयी बरीच माहिती दिली. 'लोकमत'च्या वाचनालयासाठी काही पुस्तकांच्या प्रतीही त्यांनी भेट दिल्या. एकूण दोनशेहून अधिक पुस्तके पिल्लई यांच्या नावावर आहेत. त्यातील पंधरा कवितासंग्रह आहेत. ते मल्याळम व इंग्रजी भाषेत लिहिणारे एक प्रयोगशील व चांगले लेखक असल्याची प्रचिती गोवा सरकारलाही आली आहे. गोव्यातील विविध लेखकांशी त्यांचा संवाद व संपर्क आहेच. मिझोराममधील वास्तव्यातही त्यांनी पुस्तके लिहिली होती, पण गोव्यात त्यांनी सतरा पुस्तके लिहिली याची कल्पना अनेक गोमंतकीयांना नाही.
'हेवनली आयलँडस ऑफ गोवा' हे राज्यपाल पिल्लई यांचे पुस्तक गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात प्रसिद्ध झाले. शृंगेरी येथील जगदगुरू श्री श्री विधुशेखरा भारती स्वामी यांच्या हस्ते ते पुस्तक प्रकाशित झाले होते. पिल्लई यांनी गोव्याच्या विविध गावांमध्ये सापडणाऱ्या हेरिटेज वृक्षांबाबतही 'हेरिटेज ट्रीज ऑफ गोवा' असे इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिलेले आहे. राजभवन परिसरातील वाटिका, वृक्ष याविषयीही त्यांचा अभ्यास आहे. पिल्लई यांच्याविषयी अनेक मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचाही संग्रह करून 'सव्यसाची कर्मयोगी' नावाने एक पुस्तक राज्यपालांवर केरळाचे तत्कालीन राज्यपाल अरिफ महमद खान यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहे.