सरकार गप्प बसणार नाही ; आसगाव प्रकरणात सर्व गुडांना तुरुंगात टाकणार - मुख्यमंत्री
By किशोर कुबल | Updated: June 27, 2024 14:33 IST2024-06-27T14:32:57+5:302024-06-27T14:33:18+5:30
"आगरवाडेकर कुटूंबाला घर नको असेल तर ती त्यांची मर्जी."

सरकार गप्प बसणार नाही ; आसगाव प्रकरणात सर्व गुडांना तुरुंगात टाकणार - मुख्यमंत्री
किशोर कुबल/पणजी
पणजी : आसगांव येथे घर पाडल्याच्या प्रकरणात सरकार गप्प बसणार नाही. सर्व गुंडांना टाकले जाईल. पोलिस पथके मुंबई व बेळगांवला रवाना झालेली आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
ते म्हणाले कि,‘या प्रकरणात आगरवाडेकर कुटूंबाला कोणाशीही तडजोड करायची असेल किंवा सरकारकडून त्यांना घर नको असेल तर ती त्यांची मर्जी, परंतु सरकार या प्रकरणात गप्प बसणार नाही. घर पाडणाय्रा सर्व गुंडांना आत टाकीन. जे कोणी दोषी आहेत त्या सर्व जणांवर कठोर कारवाई केली जाईल.’
आगरवाडेकर कुटूंबाने तक्रार मागे घेण्याची तयारी चालवली असल्याने त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील भाष्य केले.
दरम्यान, स्थानिक आमदार डिलायला लोबो यांनीही या कुटुंबाने अचानक घुमजाव केल्याबद्दल संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, 'आम्ही सर्वजण मदतीला गेलो परंतु या कुटुंबांने सर्वांनाच गृहीत धरले. आज सर्व गोवा त्या कुटुंबावर नाराज आहे. मुख्यमंत्र्यांनी क्राइम ब्रांचमार्फत चौकशी चालूच ठेवावी व हे प्रकरण धसास लावावे. या कुटुंबाने मला भेटण्यासाठी इच्छा प्रदर्शित केली होती परंतु मला आता त्यांना भेटायचे नाही.'
गोव फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी या प्रकरणानंतर सरकारला उपरोधिक सल्ला दिला आहे. ते म्हणाले की,' ज्या गुंडांनी घर पाडले त्यांना राज्य पुरस्कार देऊन गौरवावे तर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले त्यांना राष्ट्रपती पदके देऊन त्यांचा सन्मान करावा. सरदेसाई पुढे म्हणाले की आमदार डिलायला लोबो यांनी एका रात्रीत पक्ष बदललाला तसेच या कुटुंबाने केले. त्यामुळे डिलायला यांना धक्का बसण्याचे कारण नाही. ते म्हणाले की कुटुंबातील महिलेची 'लाय डिटेक्टर' चाचणी घेतल्यास सर्व काही बाहेर येईल.'