तटरक्षक दलाने प्रकृती बिघाडलेल्या प्रवाशाला बंदरावर आणून इस्पितळात नेले
By पंकज शेट्ये | Updated: February 20, 2024 16:50 IST2024-02-20T16:50:18+5:302024-02-20T16:50:50+5:30
सोमवारी भारतीय तटरक्षक दलाला मुरगाव बंदरापासून ४० कीलोमीटर खोल समुद्रात असलेल्या ‘सेलेब्रेटी मिलेनियम’ नामक प्रवाशी जहाजावरील एका पर्यटकाची प्रकृती बिघडल्याची माहीती मिळाली.

तटरक्षक दलाने प्रकृती बिघाडलेल्या प्रवाशाला बंदरावर आणून इस्पितळात नेले
वास्को: खोल समुद्रातून जाणाऱ्या जहाजावरील एका विदेशी प्रवाशाची प्रकृती बिघडल्याची माहीती भारतीय तटरक्षक दलाला मिळताच त्यांनी त्वरित त्या जहाजावर पोचून प्रकृती बिघाडलेल्या प्रवाशाला मुरगाव बंदरावर आणले. मुरगाव बंदरापासून ४० कीलोमीटर खोल समुद्रात असलेल्या जहाजावरील प्रवाशाला ह्रदय विकाराचा झटका आला असून त्याला उपचाराची गरज असल्याची माहीती मिळताच तटरक्षक दलाच्या जवानांनी सी - १५८ जहाजावरून तेथे पोचून आजारी प्रवाशाला मुरगाव बंदरावर आणल्यानंतर त्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल केले.
सोमवारी (दि.१९) रात्री ७.२५ वाजता भारतीय तटरक्षक दलाला मुरगाव बंदरापासून ४० कीलोमीटर खोल समुद्रात असलेल्या ‘सेलेब्रेटी मिलेनियम’ नामक प्रवाशी जहाजावरील एका पर्यटकाची प्रकृती बिघडल्याची माहीती मिळाली. फर्नांडो क्रुज मेंडीज नामक ५३ वर्षीय मेक्सीको येथील विदेशी पर्यटक प्रवाशाला ह्रदयविकाराचा झटका येऊन त्याला उपचाराची गरज असल्याची माहीती भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा विभागाला मिळाली. माहीती मिळताच दलाच्या जवानांनी सी - १५८ जहाजातून त्या जहाजाशी पोचण्याकरीता कूच केली. रात्री ९.३० वाजता तटरक्षक दलाचे जवान प्रवाशी जहाजाशी पोचल्यानंतर त्यांनी प्रकृती बिघडून उपचाराची गरज असलेल्या फर्नांडो क्रुज मेंडीज याला त्वरित तटरक्षक जहाजावर घेऊन मुरगाव बंदरावर येण्यासाठी निघाले.
प्रकृती बिघाडलेल्या प्रवाशाबरोबर त्याची पत्नी आणि एक वैद्यकीय परिचर तटरक्षक दलाच्या जहाजावरून मुरगाव बंदरावर येण्यासाठी रवाना झाले. रात्री ११.३० वाजता तटरक्षक दलाचे जहाज मुरगाव बंदरावर पोचल्यानंतर उपचाराची गरज असलेला पर्यटक प्रवाशी फर्नांडो क्रुज मेंडीज याला त्वरित खासगी इस्पितळात नेण्यात आले. ‘सेलेब्रेटी मिलेनियम’ प्रवासी जहाज मुंबई बंदरावर जात असताना त्याच्यावरील प्रवासी फर्नांडो मेंडीज याची प्रकृती बिघडल्याची माहीती तटरक्षक दलाला मिळताच त्याच्या बचाव कार्यासाठी दलाच्या जवानांनी त्या जहाजावर पोचून त्याला मुरगाव बंदरावर आणल्यानंतर उपचारासाठी इस्पितळात नेले.