खनिज वाहतूक, वाळू उपसा आदी प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना साकडे
By किशोर कुबल | Updated: June 24, 2024 14:26 IST2024-06-24T14:25:47+5:302024-06-24T14:26:02+5:30
दिल्लीत भेट : पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील गावांचा विषयही मांडला.

खनिज वाहतूक, वाळू उपसा आदी प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना साकडे
किशोर कुबल/पणजी
पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची घेतली भेट घेऊन गावांमध्ये खनिज वाहतूक सुरु करण्यासाठी कायदेशीर तोडगा काढण्याची मागणी केली तसेच सीआरझेड, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित काही वगळण्याचीही विनंती केली.
सावंत यांच्यासोबत राज्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हेही होते. खनिज वाहतूक, वाळू उपसा आदी विषयांवर पर्यावरणीय परवाने (ईसी) आदी विषयांवर चर्चा झाली.
हायकोर्टाच्या बंदीमुळे गावांमध्ये खनिज वाहतूक सुरु होऊ शकलेली नाही. यावर कायदेशीर तोडगा काढावा, अशी विनंती यादव यांच्याकडे करण्यात आली. सरकारने नऊ खाण ब्लॉकचा लिलांव केला. काही कंपन्यांनी ईसी वगैरे मिळवल्या परंतु कोर्टाच्या निर्बंधांमुळे गावांमध्ये खनीज वाहतूक सुरु करता आलेली नाही. दुसरीकडे सीआरझेडमुळे वाळू उपसा तसेच किनारी भागातील बांधकामांवर संकट आले आहे. राज्यात वाळूची टंचाई आहे. आणखी एक बाब म्हणजे गोव्यात पश्चिम घाटातील ९९ गाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित केलेले आहेत. यातील ४० गाव वगळण्याची राज्य सरकारची मागणी आहे.