महाराष्ट्राच्या मुखमंत्र्यांपेक्षा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची मालमत्ता केवळ दोन कोटींनी कमी
By किशोर कुबल | Updated: April 14, 2023 17:51 IST2023-04-14T17:50:47+5:302023-04-14T17:51:27+5:30
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मालमत्ता ११ कोटींची तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मालमत्ता ९.३७ कोटी रुपये आहे. देशभरातील ३० पैकी २९ मुख्यमंत्री करोडपती आहेत.

महाराष्ट्राच्या मुखमंत्र्यांपेक्षा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची मालमत्ता केवळ दोन कोटींनी कमी
पणजी : असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने देशभरातील मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेचा तपशील जाहीर केला असून तींत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत १२ व्या स्थानी आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सावंत यांची मालमत्ता केवळ २ कोटी रुपयांनी कमी आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मालमत्ता ११ कोटींची तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मालमत्ता ९.३७ कोटी रुपये आहे. देशभरातील ३० पैकी २९ मुख्यमंत्री करोडपती आहेत.
देशभरातील राज्ये व संघप्रदेश मिळून ३० मुख्यमंत्र्यांची मालमत्ता एडीआर या संस्थेने उघड केली आहे. या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च निवडणूक लढवताना आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली मालमत्ता जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी आपला व्यवसाय आयुर्वेदिक डॉक्टर दाखवला असून एकूण ९.३७ कोटी रुपयांची मालमत्ता व १.५० कोटींचे कर्ज दाखवले आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे सर्वात श्रीमंत आहेत. त्यांची मालमत्ता ५१० कोटी रुपयांची आहे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सर्वात कमी १५ लाख रुपयांची मालमत्ता दाखवली आहे.