दहावीत मुलीच चमकल्या
By Admin | Updated: May 26, 2014 01:23 IST2014-05-26T01:17:49+5:302014-05-26T01:23:08+5:30
दहावीत मुलीच चमकल्या

दहावीत मुलीच चमकल्या
पणजी : गोवा शालान्त मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ८३.५१ टक्के इतका लागला आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे. ६४ विद्यालयांचा निकाल ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लागलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी निकाल घसरला आहे. बोर्डाचे चेअरमन जुझे रिबेलो यांनी रविवारी दुपारी पर्वरी येथे पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. ग्रेड्सबरोबर या वर्षीही गुण दाखवण्यात आले आहेत. १८,१0३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व १५,११९ उत्तीर्ण झाले. काही विषय वगळून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८५४ होती. पैकी ४६0 उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी २४.८१ टक्के इतकी आहे. नियमित परीक्षार्थींपैकी ७५७५ मुली तर ७५४४ मुले उत्तीर्ण झाली. मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.१0 टक्के तर मुलगे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८२.९३ टक्के इतकी आहे. एकूण २४ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या वर्षी ८५.३४ टक्के इतका निकाल लागला होता. व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल कमी दिसत असल्याने त्याबाबत विचारले असता, इयत्ता नववीला चार ते पाच नवे व्यावसायिक विषय सुरू करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. आठवीपर्यंत उत्तीर्ण करण्याच्या व्यवस्थेमुळे दहावीला मुलांची संख्या वाढते, त्याबद्दल विचारले असता, गेल्या वर्षी नववीला २४ हजार विद्यार्थी होते. या वर्षी दहावीला १८ हजार विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिल्याचे रिबेलो म्हणाले. (प्रतिनिधी)