दीनदयाळ साधनसुविधा योजनेंतर्गत दहा पंचायतींचे प्रकल्प
By Admin | Updated: October 27, 2015 02:10 IST2015-10-27T02:10:33+5:302015-10-27T02:10:44+5:30
पणजी : दीनदयाळ साधनसुविधा योजनेंतर्गत आणखी दहा ग्रामपंचायतींचे प्रकल्प येणार असून येत्या डिसेंबरपर्यंत १५ कोटी रुपयांचे वितरण या पंचायतींना होणार आहे

दीनदयाळ साधनसुविधा योजनेंतर्गत दहा पंचायतींचे प्रकल्प
पणजी : दीनदयाळ साधनसुविधा योजनेंतर्गत आणखी दहा ग्रामपंचायतींचे प्रकल्प येणार असून येत्या डिसेंबरपर्यंत १५ कोटी रुपयांचे वितरण या पंचायतींना होणार आहे. मांद्रे मतदारसंघात याआधी तीन पंचायतींमध्ये या योजनेखाली कामे हाती घेण्यात आलेली आहेत.
पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी सोमवारी या योजनेच्या बाबतीत बैठक घेतली. शिवोली, पेडणे, वाळपई आदी मतदारसंघांतील ग्रामपंचायतींचे नवे प्रकल्प या योजनेखाली येतील, असे त्यांनी सांगितले. आर्लेकर म्हणाले की, केवळ समाज-सभागृहे बांधून भागणार नाही. या निधीतून बांधण्यात येणाऱ्या इमारतीत शॉपिंग कॉम्प्लेक्स यावे, जेणेकरून पंचायतींना महसुलाचे साधन उपलब्ध होईल आणि पंचायती स्वत:च्या पायावर उभ्या राहतील. सरकार पंचायतींना आवश्यक ती सर्व आर्थिक मदत करायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पायाभूत सुविधा उभारण्याकरिता या योजनेअंतर्गत पूर्वी एक कोटी रुपये दिले जात असत. ही रक्कम वाढवून आता दीड कोटी रुपये करण्यात आली आहे. राज्यातील सर्व १८९ ग्रामपंचायतींना टप्प्याटप्प्याने या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
(प्रतिनिधी)