उत्पलला सांगा, आपल्याला २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भेट; मंत्री बाबूशकडून खुले आव्हान
By पूजा प्रभूगावकर | Updated: January 10, 2024 18:40 IST2024-01-10T18:40:40+5:302024-01-10T18:40:48+5:30
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे लोकांना काही प्रमाणात त्रास होत आहे, हे मान्य आहे. मलाही त्याला त्रास होत आहे

उत्पलला सांगा, आपल्याला २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भेट; मंत्री बाबूशकडून खुले आव्हान
पणजी : स्मार्ट सिटीवरून आपल्यावर टीका करणाऱ्या उत्पल पर्रीकर यांच्यासारख्यांना उत्तर देण्यास आपण बांधील नाही. २०२७ च्या विधानसभा निवडणूुकीत त्यांनी आपल्याला भेटावे, असे खुले आव्हान पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिले आहे.
नवर्षाच्या पहाटे मळा पणजी येथील स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा जीव गेला. त्यानंतर स्मार्ट सिटीच्या कामांवर संताप व्यक्त झाला होता. यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी उडी घेत पणजीचे आमदार बाबूश यांच्यावर स्मार्ट सिटीच्या कामांवरून टीका केली होती. याला आता बाबूश यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
बाबूश म्हणाले, की स्मार्ट सिटीच्या कामांमुळे लोकांना काही प्रमाणात त्रास होत आहे, हे मान्य आहे. मलाही त्याला त्रास होत आहे; मात्र आम्ही नुसते गप्प बसलो नसून स्मार्ट सिटीचे जे प्रलंबित काम आहे, ते पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे; मात्र काही जण या कामावरून आपल्यावर टीका करीत आहेत. या टीकेने आपल्याला कुठलाही फरक पडत नसून टॉम डिक ॲण्ड हेरी यांना उत्तर देण्यास आपण बांधील नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.