तारीख सांगा; स्टेडियमसाठी निधी देतो: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 13:32 IST2025-03-02T13:31:41+5:302025-03-02T13:32:15+5:30
बीबीसीआय सचिव रोहन गावस देसाई यांचा सत्कार

तारीख सांगा; स्टेडियमसाठी निधी देतो: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात क्रीडा क्षेत्राचा बऱ्यापैकी विकास झाला आहे. गेल्या काही वर्षांत येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांचे आयोजनही पार पडले आहे. केवळ एक क्रिकेट स्टेडियमची गरज आहे. ती देखील आता शक्य होईल. जीसीएशी संलग्न क्लब्सनी एकत्रित येत पायभरणीची एक तारीख निश्चित करून सांगावी. आवश्यक निधी त्या दिवशी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
रोहन गावस देसाई यांनी शनिवारी बीसीसीआयच्या संयुक्त सचिवपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर येथे त्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उपस्थित होते. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, चेतन देसाई, जीसीएचे शांबा नाईक देसाई, दया पागी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते यावेळी रोहन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
केवळ क्लब्सच स्टेडियम उभारू शकतात
राज्यात आतंरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम उभारणे हे माझ्या किंवा सरकारच्या हातात नाही, तर हे केवळ क्लब्सच्या हातात आहे. आम्ही केवळ प्रशासन स्तरावर आवश्यक मदत करू शकतो. पण स्टेडियम कुठे करावा, कधी करावा, नेमके काय करावे हा निर्णय केवळ क्लब्सच घेऊ शकतात. त्यामुळे वेळ न दवडता मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित येऊन हे स्टेडियम साकारण्यास मदत करावी, असे आवाहन रोहन गावस देसाई यांनी यावेळी केले.
देशातील बहुतांश राज्यात एक चांगले स्टेडियम आहे. लहान लहान राज्यात देखील स्टेडियम आहे. पण आमचे राज्य पर्यटन राज्य म्हणून ओळखले जात असून देखील एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम येथे नाही याची खंत वाटते, असेही ते म्हणाले.