चहा, जेवण मागणे हाही भ्रष्टाचारच
By Admin | Updated: January 11, 2015 02:00 IST2015-01-11T01:58:54+5:302015-01-11T02:00:05+5:30
लक्ष्मीकांत पार्सेकर : एक खिडकी योजनेचा प्रारंभ

चहा, जेवण मागणे हाही भ्रष्टाचारच
पणजी : केवळ पैसे घेतले म्हणजेच भ्रष्टाचार होतो असे नाही, तर अधिकाऱ्यांनी चहा, जेवण वगैरे मागणे म्हणजेही भ्रष्टाचारच आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी येथे एका सोहळ्यावेळी नमूद केले.
अधिकारी काहीवेळा जेवणाचे व चहाचे बिल अर्जदारांकडून वसूल करू पाहातात. हे चुकीचे आहे. हाही भ्रष्टाचारच आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अर्जदारांची कामे वेळेत करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा मार्ग अवलंबू नये, असे पार्सेकर म्हणाले.
मालमत्तांच्या पार्टिशनसाठी एक खिडकी योजनेचा शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या आधारे उत्तर गोवा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर एक खिडकी योजना चालेल. संगणकीकृत प्रशासन पद्धत जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. या पद्धतीमुळे पार्टिशनची प्रक्रिया सुलभ झाली आहे. अशा प्रकारची पद्धत केवळ जिल्हाधिकारी कार्यालयापुरतीच मर्र्यादित न राहता अन्य खात्यांतील प्रमुखांनीही अशा प्रकारच्या योजना मार्गी लावाव्यात; जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. एक खिडकी योजना ही केवळ एकाच शासकीय कामापुरती मर्यादित असू नये, तर अन्य सर्व कामेही अशाच पद्धतीने व्हावी म्हणून सर्वांनी प्रयत्न करावा. केवळ एक खिडकीच नव्हे तर एक दरवाजा पद्धतही राबवावी, अशी सूचना मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केली.
लोकांना सर्व कामांसाठी उठसूठ शासकीय कार्यालयात खेपा माराव्या लागू नयेत. लोकांनी केलेल्या अर्जांची स्थिती काय आहे ते अर्जदारांना एसएमएसद्वारे आॅनलाईन पद्धतीने कळविले जायला हवे. यामुळे शासकीय कामात पारदर्शकताही येईल व भ्रष्टाचार कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांना जर चांगली सेवा दिली नाही व लोकांची कामे केली नाहीत तर त्याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होतो. सर्व सरकारी खाती व महामंडळांनी एकत्र यावे व आॅनलाईन पद्धतीने लोकांना अधिकाधिक सेवा पुरवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
येथील मिनेझिस ब्रागांझा संस्था सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी महसूल खात्याचे प्रधान सचिव आर. के. श्रीवास्तव तसेच उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन, स्वप्नील नाईक, जीईएलचे दत्तप्रसाद नाईक या वेळी उपस्थित होते. आॅनलाईन पद्धतीने लोकांच्या दारापर्यंत शासकीय सेवा पोहचायला हव्यात, असे श्रीवास्तव म्हणाले. (खास प्रतिनिधी)