कोकणी चित्रपटासाठी पुढाकार घ्या
By Admin | Updated: April 6, 2015 01:20 IST2015-04-06T01:20:20+5:302015-04-06T01:20:32+5:30
पणजी : राज्यात दिवसेंदिवस कोकणी भाषा बोलणाऱ्यांबरोबर समजणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळेच कोकणी चित्रपटांची

कोकणी चित्रपटासाठी पुढाकार घ्या
पणजी : राज्यात दिवसेंदिवस कोकणी भाषा बोलणाऱ्यांबरोबर समजणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळेच कोकणी चित्रपटांची संख्या देखील वाढत आहे. या महोत्सवामुळे नवीन कलाकारांना व दिग्दर्शकांना प्रोत्साहन मिळत असून कोकणी चित्रपटांच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्या, असे आवाहन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले़
माहिती व प्रसिध्दी खात्याने गोवा मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ५, ६ व ७ अशा तिन्ही गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते़ रविवार, दि. ५ रोजी कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात हा सोहळा उत्साहात पार पडला़
व्यासपीठावर खासदार नरेंद्र सावाईकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, सभापती राजेंद्र आर्लेकर, उपाध्यक्ष दामू नाईक, विल्फ्रेड मिस्किता, अलका कुबल, समीर आठल्ये, आशालता वाबगावकर, अभिजित साटम, मधुरा साटम, अमृता सुभाष उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री डिसोझा म्हणाले की, महोत्सवात चित्रपट पुरस्कारासाठी नामांकन खूप कमी आहेत; कारण चित्रपट निर्मितीसाठी जास्त खर्च येतो. गोव्यात उत्कृष्ट दर्जाचे कलाकार व दिग्दर्शक आहेत. त्यामुळे कोकणी चित्रपटांची निर्मिती वाढवायला हवी. तसेच चित्रपटांची प्रसिध्दी प्रेक्षकांवर अवलबंून असते. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपट गृहात जाऊन कलाकारांच्या कलेला दाद दिली पाहिजे.
राजेंद्र आर्लेकर म्हणाले की, गोव्यात चित्रपटांची संस्कृती रूजू लागली आहे. सरकार नेहमीच कलाकारांना प्रोत्साहन देते. त्यामुळे गोवा हे कायमस्वरूपी चित्रपटसृष्टी क्षेत्र बनविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यामुळे चांगल्या दिग्दर्शकांनी पुढाकार घेऊन चित्रपट निर्मिती कारावी.
या वेळी नरेंद्र सावईकर, विल्फ्रेड मिस्किता यांनीही चित्रपट महोत्सवबद्दल मनोगत व्यक्त केले. दामू नाईक यांनी स्वागत केले. दरम्यान, २००८ ते २०१३ पर्यंतचे मराठी व कोकणी विभागातील चित्रपटांचा पारितोषिक वितरण सोहळा झाला. तसेच सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी या महोत्सवाचा समारोप सोहळा पार पडला़
(प्रतिनिधी)