तेजपाल प्रकरणी सुनावणी स्थगित

By Admin | Updated: January 17, 2015 03:02 IST2015-01-17T02:58:14+5:302015-01-17T03:02:11+5:30

सर्वोच्च न्यायालय : आवश्यक कागदपत्रे देण्याचा गोवा पोलिसांना आदेश

Suspended hearing in Tejpal case | तेजपाल प्रकरणी सुनावणी स्थगित

तेजपाल प्रकरणी सुनावणी स्थगित

पणजी : सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला तेहलकाचा संस्थापक तरुण तेजपाल याला सर्वोच्च न्यायालयाने बचावासाठी दस्तऐवज व पुरावे गोळा करण्यास तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. तेजपालला आवश्यक ती कागदपत्रे द्यावीत, असे न्यायालयाने गोवा पोलिसांना बजावले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी तीन आठवडे स्थगित ठेवल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
बचावासाठी आपण अजून आवश्यक ते पुरावे तसेच कागदपत्रे गोळा करू शकलेलो नाही, त्यामुळे आपल्याला थोडा अवधी द्यावा, अशी मागणी तेजपालने सर्वोच्च न्यायालयात केली होती. लैंगिक अत्याचार प्रकरणात गोव्यातील न्यायालयात त्याच्याविरुध्द सुनावणी चालू आहे.
दूरध्वनीविषयक नोंदी, तसेच असंपादित सीसीटीव्ही कॅमेरा फूटेज आपल्याला मिळालेले नाही, असे त्याचे म्हणणे आहे. गोवा पोलिसांनी याच पुराव्यांच्या आधारे त्याच्यावर आरोपपत्र ठेवले आहे.
न्यायमूर्ती एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तेजपाल यालाही यापुढे कोणत्याही कारणास्तव खटल्यास विलंब करू नये, असे बजावले आहे. तेजपालच्या वकिलाने गोवा सत्र न्यायालयाने २३ डिसेंबर २0१४ रोजी दिलेल्या आदेशाचा उल्लेख करून अशिलाला बचावासाठी दस्तऐवज गोळा करण्यासाठी मुदत मिळाली पाहिजे, अशी मागणी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने याआधी कनिष्ठ न्यायालयाला वरील प्रकरणात दैनंदिन सुनावणी घेऊन आठ महिन्यांत निकाल देण्याचे आदेश दिले होते. याचा आधार घेऊनच ट्रायल कोर्टाने सुनावणी सुरू केल्याचे तेजपालचे म्हणणे आहे. नोव्हेंबर २0१३ मध्ये बांबोळी येथे थिंक फेस्टच्यावेळी सहकारी महिला पत्रकारावर लिफ्टमध्ये त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ३0 नोव्हेंबर २0१३ रोजी त्याला पोलिसांनी अटक केली
होती. सध्या तो अंतरिम जामिनावर बाहेर आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suspended hearing in Tejpal case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.